तालिबानच्या अफगाणिस्तानातील यशानंतर पाकिस्तानातील हल्ले व घातपातांची तीव्रता वाढली

ग्वादर – शुक्रवारी पाकिस्तानच्या ग्वादर शहरात जबरदस्त स्फोट झाला. हा आत्मघाती हल्ला होता, असा दावा केला जातो. तसेच यात सुमारे सहा चिनी इंजिनिअर्सचा बळी गेल्याची माहिती सोशल मीडियावर आली होती. तर पाकिस्तानच्या पोलिस यंत्रणांनी यात स्फोटात तीनजणांचा बळी गेल्याचे सांगून यात दोन मुलांचा समावेश असल्याची माहिती दिली. याच्या बरोबरीने पाकिस्तानात सुरू असलेल्या चीनच्या ‘सीपीईसी’ प्रकल्पाविरोधात ग्वादरमध्ये जोरदार निदर्शने झाल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानातील हे घातपात व हिंसक कारवाया अफगाणिस्तानात अराजक माजत असल्यामुळे वाढत आहे, असा इशारा विश्‍लेषकांनी दिला आहे.

तालिबानच्या अफगाणिस्तानातील यशानंतर पाकिस्तानातील हल्ले व घातपातांची तीव्रता वाढलीअफगाणिस्तानवरील तालिबानच्या ताब्यामुळे पाकिस्तान कमालीचा असुरक्षित बनणार असल्याची चिंता पाकिस्तानचे विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. त्यांची चिंता निराधार नाही, हे गेल्या काही दिवसांमधील घटनांवरून उघड झाले आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या बहावलनगर येतील एका धार्मिक मिरवणुकीत बॉम्बस्फोट होऊन सहा जण ठार तर 59 जण जखमी झाले होते. त्यानंतर ग्वादर शहरात बॉम्बस्फोटाची बातमी आली आहे. अद्याप याचे सारे तपशील समोर आलेले नसले, तरी यामागे घातपात असण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. तसेच हा स्फोट चिनी इंजिनिअर्सला लक्ष्य करण्यासाठी झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यात चीनचे सहा इंजिनिअर्स ठार झाल्याची माहिती सोशल मीडियावर आली होती. पण त्याला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही.

अफगाणिस्तानवरील तालिबानचे राज्य येत आहे, ही पाकिस्तानसाठी अत्यंत समाधानाची बाब ठरते, असा दावा या देशातील कट्टरपंथियांकडून केला जातो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी देखील जाहीरपणे त्यावर आनंद व्यक्त केला आहे. पण लवकरच याचे परिणाम पाकिस्तानात दिसू लागतील, कारण पाकिस्तानातील कट्टरपंथियांना तसेच दहशतवादी संघटनांना तालिबानच्या विजयामुळे बळ मिळालेले आहे, असे विश्‍लेषक तसेच बुजूर्ग पत्रकारांचे म्हणणे आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील तुरुंगात असलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांना मोकळे केले आहे. ही एक बाब पाकिस्तानला असुरक्षित करण्यासाठी पुरेशी ठरावी, असा इशारा या सर्वांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या लष्करावरील हल्ले तसेच पंथिय विद्वेषातून होणारे हल्ले आणि महिलांवरील अत्याचारात लक्षणीय वाढ झालेली आहे. ही अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयाची पाकिस्तानला मिळालेली देणगी ठरते, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. इतकेच नाही तर शुक्रवारी पाकिस्तानच्या काही धार्मिक संस्थांनी तालिबानचे झेंडे लावून पाकिस्तानच्या सरकारला गंभीर इशाराच दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत. या बातम्यांचा दाखला देऊन पाकिस्तानला नजिकच्या काळात भयंकर अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागणार असल्याचा निष्कर्ष माध्यमांकडून नोंदविला जातो.

leave a reply