पाकिस्तानातील चिनी नागरिकांवरील हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर

- चीनने पाकिस्तानवरील दडपण वाढविले

पाकिस्तानवरील दडपणबीजिंग – दहशतवाद्यांवर कारवाई करण्याच्या आघाडीवर चालढकल करणार्‍या पाकिस्तानला अमेरिकेने वारंवार ‘डू मोर’च्या सूचना केल्या होत्या. पण आता पाकिस्तान अमेरिकेकडून अशा सूचना स्वीकारणार नाही, असे दावे पाकिस्तानच्या सरकारकडून केले जातात. याबाबत अमेरिकेला नकार देणार्‍या पाकिस्तानला आता दहशतवाद्यांवर कारवाईसाठी निकटतम मित्रदेश असलेल्या चीनकडूनच ‘डू मोर’च्या धमक्या मिळत आहेत. बलोचिस्तानच्या ग्वादर बंदरात झालेल्या स्फोटात चिनी कामगार जखमी झाल्यानंतर चीनने पुन्हा एकदा या प्रकरणी पाकिस्तानला खडसावले आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि आयएसआयचे प्रमुख फैझ हमीद यांना चीनच्या दूतावासाने खडसावल्याचे वृत्त आहे.

चीन व पाकिस्तानच्या ‘सीपीईसी’ प्रकल्पामध्ये बलोचिस्तान प्रांतात फार मोठी गुंतवणूक झालेली आहे. बलोचिस्तानचे ग्वादर बंदर चीनने ताब्यात घेतल्याचे मानले जाते. मात्र यावर बलोच जनतेचा अधिकार आहे, पाकिस्तानचा नाही, असा इशारा बंडखोर बलोच संघटना देत आहेत. या संघटनांनी चीनला बलोचिस्तानमधील गुंतवणुकीवरून सज्जड इशारा दिला होता. पण चीनने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर बलोची संघटनांनी चीनच्या प्रकल्पांवर तसेच चिनी नागरिकांवर हल्ले सुरू केले होते. शुक्रवारी ग्वादरमधील ‘ईस्ट बे एक्सप्रेस वे’ प्रकल्पात आत्मघाती हल्ला झाला.

मोटरसायकलवरून येणार्‍या एकाने चिनी कामगार असलेल्या वाहनाला धडक मारून आत्मघाती स्फोट घडवून आणला. यात नक्की किती हानी झाली, याबाबत परस्परविरोधी दावे प्रसिद्ध झाले आहेत. यात सहा ते नऊ इतक्या संख्येने चिनी इंजिनिअर्सचा बळी गेल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या. पण पाकिस्तानने अधिकृत पातळीवर माहिती देताना यात तीन जणांचा बळी गेल्याचे सांगून यामध्ये दोन मुले होती, असे स्पष्ट केले. तसेच चिनी कामगार जखमी झाले आहेत, असा दावा पाकिस्तानने केला. पण या हल्ल्यावर चीनकडून आलेली तीव्र प्रतिक्रिया पाहता, पाकिस्तान देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानातील सुरक्षाविषयक परिस्थिती भयंकर बनलेली आहे, अशी टीका चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्राने केली. तसेच पाकिस्तानने सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करावी व चीनच्या नागरिकांना अधिक संरक्षण पुरवावे, असे या दैनिकाने बजावले आहे. तर चीनने अधिकृत पातळीवर याबाबत पाकिस्तानला जाब विचारलेला नसला, तरी चीनच्या दूतावासाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि आयएसआयचे प्रमुख फैझ हमीद यांना खरमरीत संदेश पाठविल्याच्या बातम्या आलेल्या आहेत.

पुढच्या काळात पाकिस्तानातील चीनच्या हितसंबंधांवर असे हल्ले होत राहणार असल्याचे बलोच संघटना उघडपणे सांगत आहेत. हे हल्ले रोखले नाहीत, तर चीन पाकिस्तानात आपले सैन्य आणि क्षेपणास्त्रे तैनात करील, असा इशारा चीनने दिला आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या तावडीत सापडल्यानंतर, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना चीनच्या प्रकल्पांवर हल्ले चढविण्याची शक्यता अधिकच बळावल्याचा दावा केला जातो. त्यामुळे एकेकाळी अमेरिकेच्या ‘डू मोर’च्या सूचना ऐकणार्‍या पाकिस्तानवर आता चीनकडूनही तसाच दबाव येत असल्याचे दिसत आहे.

leave a reply