देशाची कृषी निर्यात पहिल्यांदाच ५० अब्ज डॉलर्सच्या पुढे पोहोचली

- तांदळाच्या जगातिक बाजारपेठेतील ५० टक्के हिस्सा भारताने काबीज केला

कृषी निर्यातनवी दिल्ली – पुरवठा साखळतील अडथळे, कंटेनरची कमतरता व इतर लॉजिस्टिक आव्हानानंतरही भारताच्या कृषी निर्यातीमध्ये यावर्षी मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. एका वर्षात भारताची कृषी निर्यात १९ टक्क्यांपेक्षा अधिकने वाढून ५० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. पहिल्यांदाच भारताच्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीने हा विक्रमी टप्पा ओलांडला असून येत्या वर्षात भारत या क्षेत्रात आणखी मोठी मजल गाठेल, असा दावा केला जातो. सध्या जगातील तांदळाच्या बाजारपेठेतील ५० टक्के हिस्सा एकट्या भारताने काबीज केल्याची माहिती, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली.

देशाने कृषी मालाच्या निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. भारताने २०२१-२२ वर्षात व्यापारी माल निर्यात क्षेत्रात ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडल्याचे काही दिवसांपूर्वीच वाणिज्य विभागाने जाहीर केले होते. तर दोनच दिवसांपूर्वी ३१ मार्चपर्यंतची आर्थिक वर्षातील एकूण मालनिर्यात ४१८ अब्ज डॉलर्स इतकी नोंदविण्यात आल्याची माहिती, वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली होती. सरकारी प्रत्येक महिन्याला ३० अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. कोरोनाच्या दुसर्‍या व तिसर्‍या लाटेनंतरही भारताने हा विक्रमी टप्पा गाठल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले होते. मात्र यावेळी कोणत्या क्षेत्रातून किती निर्यात झाली याचे तपशील देण्यात आले नव्हते.

बुधवारी वाणिज्यमंत्रालयाने २०२१-२२ सालात कृषी क्षेत्रातून झालेल्या निर्यातीचे तपशील जाहीर केले. यानुसार या आर्थिक वर्षात कृर्षी क्षेत्राची निर्यात ५०.२१ अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत देशातून झालेली ही सर्वाधिक कृषी निर्यात आहे. २०२०-२१ या आधीच्या आर्थिक वर्षात ४१.८७ अब्ज डॉलर्सची कृषी निर्यात झाली होती. त्यानुसार या वर्षात कृषी निर्यात सुमारे १९.९२ अब्ज टक्क्यांनी स्पष्ट होते. जवळपास २० टक्क्यांच्या या वाढीने भारताला कृषी उत्पादनाच्या जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचा निर्यातदार देश म्हणून समोर आणले आहे. २०२०-२१ सालातही कृषी क्षेत्राच्या निर्यातीत १७.६६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती.

कृषी उत्पादनांमध्ये सर्वाधिक निर्यात ही तांदळाची झाली आहे. भारताने ९.६५ अब्ज डॉलर्सचा तांदूळ निर्यात केला आहे. भारताने तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील ५० टक्के हिस्सा काबिज केला आहे. त्याचबरोबर २.१९ अब्ज डॉलर्सचे गहू देशातून निर्यात झाले आहेत. देशातून एका वर्षात गव्हाची निर्यात सुमारे चार पटीने वाढली आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात ही गहू निर्यात केवळ ५६ कोटी ८० लाख डॉलर्स इतकी होती. युक्रेन युद्धामुळे ब्लॅक सी क्षेत्रातील देशांमधून गहू निर्यात थांबली असून याचा लाभ भारताला मिळाला आहे. तांदूळ आणि गव्हाबरोबर साखरेच्या निर्यातीमध्येही चांगली वाढ झाली असून ४.६ अब्ज डॉलर्सची साखर निर्यात देशातून झाली आहे. याशिवाय इतर धान्याची निर्यात १.०८ अब्ज डॉलर्स इतकी नोंदविण्यात आली. ही सुद्धा आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात आहे.

अन्नधान्याच्या निर्यातीतून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील शेतकर्‍यांना चांगला लाभ झाल्याचा दावा वाणिज्य मंत्रालायाने केला आहे.

अन्नधान्यानंतर सर्वाधिक निर्यात मरीन अर्थात सागरी उत्पादनांची झाली आहे. या क्षेत्रातून ७.७१ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. याशिवाय मसाल्यांची निर्यातही वाढून ४ अब्ज डॉलर्सवर गेली असून कॉफी निर्यातीने पहिल्यांदाच एक अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. २०२० सालात जगभरात कोरोनाच्या फैलावानंतर खाद्यान्नाची मागणी वाढली.

यामुळे कृषी निर्यात वाढविण्यासाठी संधी उपलब्ध झाली. कोरोनाच्या महासाथीत असलेल्या आव्हानांचा सामना करीत भारताने खाद्यांनाचा पुरवठा जागतिक बाजारपेठेत केला. त्यामुळे भारत खाद्यान्न क्षेत्रात विश्‍वासपूर्ण पुरवठादार देश म्हणून समोर आल्याचा दावा, वाणिज्य मंत्रालयाने केला आहे.

leave a reply