चीन व पाकिस्तानचा एकाच वेळी सामना करण्यासाठी वायुसेना सज्ज

एकाच वेळी सामनानवी दिल्ली – चीन आणि पाकिस्तानचा एकाच वेळी सामना करण्याची पूर्ण सज्जता भारताच्या वायुसेनेने ठेवलेली आहे, असा संदेश नवे वायुसेनाप्रमुख विवेक राम चौधरी यांनी दिला. लडाखच्या दक्षिण भागाजवळ असलेल्या तिबेटमध्ये चीनचे प्रचंड प्रमाणात तैनाती वाढविली असून चीनच्या हवाई दलाने इथे जोरदार तयारी सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र चीनच्या इथल्या तैनातीचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही कारण वायुसेनेने आवश्यक असलेली सारी खबरदारी घेतलेली आहे, अशी ग्वाही वायुसेनाप्रमुखांनी दिली.

वायुसेनेच्या ८९ व्या स्थापनादिनाच्या पूर्वसंध्येला एअरचिफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून चीनने लडाखच्या एलएसीजवळील भागात मोठ्या प्रमाणात तैनाती केल्याच्या बातम्या येत आहेत. विशेषतः तिबेटमधील तीन धावपट्ट्या चीनने कार्यान्वित केल्या असून इथल्या चीनच्या हवाई दलाच्या इथल्या कारवाया नजरेत भरणार्‍या आहेत. त्याचवेळी चीनने आपल्या लष्कराचीही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तैनाती केली आहे. यामुळे चीन पुन्हा एकदा एलएसीवर भारताची कुरापत काढण्याची तयारी करीत असल्याचे दावे केले जातात. त्या पार्श्‍वभूमीवर, नव्या वायुसेनाप्रमुखांनी देशाला आश्‍वस्त केले.

आरकेएस भदौरिया यांच्याकडून ३० सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारणारे नवे वायुसेनाप्रमुख व्हीआर चौधरी यांनी वायुसेना चीनच्या या हालचालींकडे सावधपणे पाहत असल्याचे स्पष्ट केले. तसेच चीनपासून असलेल्या या धोक्याचा सामना करण्याची पूर्ण सज्जता वायुसेनेने ठेवलेली आहे. इतकेच नाही तर एकाच वेळी चीन व पाकिस्तानच्या आव्हानाचा सामना करण्याची क्षमता वायुसेनेकडे आहे, असा विश्‍वास एअरचीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी चीनचे हवाई दल लडाखच्या एलएसीवर तयारी करीत असले तरी या उंचावरील क्षेत्रातील चीनची हवाई क्षमता अत्यंत मर्यादित आहे, याची जाणीव वायुसेनाप्रमुखांनी करून दिली.

केवळ पाकिस्तानमार्फत पाश्‍चिमात्य तंत्रज्ञान चीनला पुरविले जात आहे, हाच एकमात्र चिंतेचा विषय ठरू शकतो, असे वायुसेनाप्रमुख म्हणाले. अमेरिकेने पाकिस्तानला पुरविलेल्या संरक्षणसाहित्याचा वापर करून चीन याचे तंत्रज्ञान मिळवित असल्याची बाब याआधी समोर आली होती. अफगाणिस्तानात तालिबानच्या हाती पडलेली अमेरिकी शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य पाकिस्तानमार्फत चीनपर्यंत पोहोचत असून याच्या रिव्हर्स इंजिनिअरिंगद्वारे चीन याचे तंत्रज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर वायुसेनाप्रमुखांनी ही चिंता व्यक्त केली आहे. याद्वारे पाकिस्तान अमेरिकेचा विश्‍वासघात करीत असल्याची बाब वायुसेनाप्रमुखांनी लक्षात आणून दिली आहे.

दरम्यान, अत्याधुनिक रफायल लढाऊ विमाने व इतर प्रगत यंत्रणांच्या समावेशामुळे वायुसेनेची मारकक्षमता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, याकडे एअरचीफ मार्शल चौधरी यांनी लक्ष वेधले. तसेच पुढच्या काळात भारतीय संरक्षणदलांच्या एकीकृत प्रतिसादावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून वायुसेना यासाठी बांधिल असल्याचे वायुसेनाप्रमुखांनी स्पष्ट केले.

leave a reply