अंतराळाचे लष्करीकरण होत आहे वायुसेनेने स्पेसफोर्स स्थापण्याचा विचार करावा

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – अंतराळाचे लष्करीकरण अतिशय वेगाने होत असून हे भविष्यातील मोठे आव्हान असणार आहे. अंतराळातून होणारे हल्ले आणि अंतराळातील भारतीय उपग्रह, अवकाशयान व इतर यंत्रणांच्या संरक्षणासाठी देशाला पूर्णपणे सज्ज व्हावे लागेल. अंतराळक्षेत्रातील हे धोके लक्षात घेऊन वायुसेनेने आपले रुपांतर ‘एरोस्पेस फोर्स’मध्ये करण्यासाठी बदल घडवावेत, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे.

स्पेसफोर्स‘परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि हा नियम युद्धासाठीही लागू पडतो. त्यामुळे आपल्याला भविष्यातील युद्धतंत्राचे पूर्वानुमान सतत लावत रहावे लागेल’, असे सांगून भारतविरोधी देश अंतराळाचा लष्करी वापर करण्याच्या दृष्टीने झपाट्याने पावले टाकीत आहेत, याकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लक्ष वेधले. अंतराळाच्या होत असलेल्या लष्करीकरणामुळे भारताचे हितही धोक्यात येऊ शकते. अंतराळातील व जमिनीवरील भारतीय संपत्तीला यामुळे धोका आहे, असा इशारा संरक्षणमंत्र्यांनी दिला.

त्यामुळे भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हानांना ओळखून त्यासाठी पूर्णपणे सज्ज होण्याची आवश्यकता आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बजावले. संरक्षणमंत्र्यांनी कोणत्याही देशाचा नावाचा उल्लेख केला नसला, तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा चीनकडे असल्याचे स्पष्ट होते. ‘एअर मार्शल पीसी लाल मेमोरिअल’मध्ये आयोजित व्याख्यानात संरक्षणमंत्री बोलत होते. यावेळी वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर.चौधरीही उपस्थित होते.

अंतराळातून होऊ शकणाऱ्या हल्ल्यापासून देशाचे व अंतराळातील देशाच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास, त्यामध्ये कुशलता मिळविणे, मानव संसाधनाचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले. वायुसेनेने यासाठी आपले रुपांतर ‘एरोस्पेस फोर्स’मध्ये करून भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याची तयारी करावी, असे राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.

चीन अंतराळात सोडत असलेले उपग्रह, अवकाशयान हे संशोधन व टेहळणीसह लष्करी कारणांसाठी असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. चीनने अंतराळात वर्चस्व गाजविण्यासाठी अंतराळाचे लष्करीकरण करीत असल्याचा अहवाल गेल्यावर्षी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिला होता. अंतराळातील उपग्रह भेदण्यासाठी ‘डायरेक्टेड एनर्जी सिस्टिम’सारखे तंत्रज्ञान चीनकडे असल्याचे या अहवालात म्हटले होते.

अमेरिकेने यापूर्वीच आपली स्पेस फोर्स उभारली आहे. रशियाकडेही स्पेस फोर्स असून तीन वर्षांपूर्वी नाटोने अंतराळ हे पाचवे युद्धक्षेत्र घोषित केले होते. त्यानंतर फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी या देशांनीही भविष्यातील अंतराळातील धोक्यांचा सामना करण्यासाठी स्पेसफोर्सची स्थापना केली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी वायुसेनेला दिलेली सूचना अत्यंत महत्त्वाची ठरते.

दरम्यान, भविष्यातील युद्ध कसे असेल हे सिरिया, इराक, अफगाणिस्तान आणि आता युक्रेनच्या युद्धावरून लक्षात येईल. ही युद्धे सांकेतिक म्हणून अभ्यासून स्थानिय धोक्याला जोडून तयारी करावी लागेल. यासाठी भारतीय संरक्षणदलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा व भविष्यातील युद्धासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले.

त्याचवेळी महागडी शस्त्रयंत्रणा आपल्याला विजय मिळवून देईल, ह्याची शाश्वती नाही. नव्या तंत्रज्ञानाची शस्त्रे जमा करता येतील. मात्र ही शस्त्रे विजयाची खात्री देऊ शकत नाहीत. तर शस्त्रे व यंत्रणांची तैनाती कशी केली यावर आपल्याला युद्धात त्याचा कसा लाभ मिळेल हे अवलंबून असते. तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे, यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र योग्य तैनातीविना हे तंत्रज्ञान व यंत्रणा केवळ दिखाऊ ठरतील, असे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले.

leave a reply