राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल इराणच्या दौऱ्यावर

तेहरान – सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी इराणला भेट दिली. डोवल यांच्या दौऱ्यात आर्थिक, राजकीय, सुरक्षाविषयक मुद्यांवर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताने अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांना न जुमानता रशियाच्या धर्तीवर इराणकडूनही इंधन खरेदी सुरू करावी, असे आवाहन इराण वारंवार करीत आहे. त्याचबरोबर इराणमध्ये भारताने विकसित केलेले छाबर बंदर प्रकल्पावर अंमलबजावणी आणि याद्वारे मध्य आशियाई देशांबरोबर कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर सातत्याने प्र्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सौदी अरेबिया आणि इराणचा समेट घडविल्यानंतर प्रथमच भारताचे वरिष्ठ अधिकारी इराणला गेल्याने या भेटीचे महत्त्व वाढले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल इराणच्या दौऱ्यावरराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी सोमवारी इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये वर्तमान भूराजकीय परिस्थितीपासून विविध विषयावर व्यापक चर्चा झाल्याची माहिती इराण सरकारच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिली आहे. विविध आंतरराष्ट्रीय तसेच महत्त्वाच्या क्षेत्रिय घडामोडी आणि आर्थिक, राजकीय, सुरक्षाविषयक मुद्यांवर डोवल यांनी शामखानी यांच्याशी चर्चा केली. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दोल्लाहियान यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केल्याचे इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

गेल्या काही आठवड्यांमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या दौऱ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. महिन्याभरापूर्वी चीनने सौदी अरेबिया व इराणचा समेट घडवून आणला होता. या दोन्ही देशांबरोबर भारताचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. सौदी व इराणकडून भारत इंधनाची खरेदी करीत आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांबरोबरचा व्यापार वाढविण्यासाठीही भारताचे प्रयत्न सुरू आहेत. सौदी अरेबिया अणि इराणमध्ये यशस्वी मध्यस्थी करणाऱ्या चीनचा इराणवरील प्रभाव वाढेल, असे दावे केले जात होते. पण इराणने याआधीच भारत आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे व या घडामोडींचा भारताबरोबरील संबंधांवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. इराण आणि सौदी अरेबियामध्ये हा समेट झाल्यावर प्र्रथमच भारताच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी इराणला भेट दिली आहे.

छाबर बंदर हा दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्यातील प्राधान्याचा मुद्दा आहे. हे बंदर भारत आणि इराण दोघांसाठी व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. भारताने इराणला उभारून दिलेल्या या बंदरामुळे चीनने पाकिस्तानात उभारलेल्या ग्वादर बंदराचे महत्त्व संपुष्टात आल्याचा दावा केला जातो. चीनदेखील छाबर बंदराचा वापर करीत असल्याच्या बातम्या समोर आल्या होता. या बंदरामुळे पाकिस्तानला वगळून अफगाणिस्तान व मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग तयार झाला आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच भारत आणि मध्य आशियाई देशांची छाबर बंदराच्या वापरासंदर्भात एक बैठक पार पडली होती. या बंदराच्या माध्यमातून संपर्क व व्यापार वाढविण्याचा निर्णय झाला होता. गेल्याच महिन्यात इराणचे राजदूत इराज इलाही यांनी, छाबर बंदर प्रकल्पावर पूर्णपणे अंमलबजावणी सुरू झाल्यावर भारत आणि इराणला मोठा लाभ मिळेल, असे सांगितले होते. हे बंदर ‘ट्रान्सिस्ट हब’ बनेल तसेच या प्रकल्पाकडे आर्थिक दृष्टिकोनाच्या पुढे जाऊन पहायला हवे, असे इलाही म्हणाले होते.

भारत सध्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओचे अध्यक्षपद भूषवित आहे. पुढील आठवड्यात गोव्यात एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत इराणचा समावेश एससीओ सदस्य म्हणून करण्यात येणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डोवल यांच्या दौऱ्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल इराणच्या दौऱ्यावर असताना भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे सौदी अरेबियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या भेटीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वाढविण्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षात तेथून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सौदी अरेबिया भारताला मदत करीत आहे. त्याबद्दलही सौदीचे आभार व्यक्त करण्यात येणार आहेत.

हिंदी English

 

leave a reply