पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात उद्घाटन केलेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर घातपाताचा कट

एनआयए, एटीएस आणि रेल्वेकडून तपास

उदयपूर/नवी दिल्ली – 13 दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर घातपाताचा मोठा कट आखण्यात आला होता. शनिवारी रात्री या मार्गावर सलूम्बर येथे केवडे की नाल भागातील एका पुलावरील रेल्वे रुळ स्फोटके लावून उडविण्यात आले. सुदैवाने स्फोटाचा आवाज ऐकल्यावर घटनास्थळी आलेल्या गावकऱ्यांनी याची सूचना रेल्वेला दिल्याने या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्या आधीच रोखण्यात आल्या. यामुळे मोठी जीवितहानी टळली. या प्रकरणात ‘एनआयए’, एटीएस आणि रेल्वेकडून तपास हाती घेण्यात आला आहे.

udiapurशनिवारी रात्री स्फोटाचा मोठा आवाज ऐकून येथील पुलावर पोहोचलेल्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना येथे रेल्वे रुळ उखडले गेल्याचे व बाजूला स्फोटके पसरल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती रेल्वेला कळवताच घटनास्थळी रेल्वे पोलीस व राजस्थानचे दहशतवादी विरोधी पथक दाखल झाले. एनआयएचे पथकही रविवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. ही स्फोटके खाणीमध्ये वापरली जाणारी स्फोटके होती व रेल्वे रुळ उखडले जातील अशा पद्धतीने ती येथे लावण्यात आली होती, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोठ्या घातपाताच्या कटाची शक्यता बळावली आहे. यामागे कोणती संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र घातपाताची शक्यता गृहीत धरून तपास सुरू करण्यात आला आहे.

‘एनआयए’, एटीएस आणि रेल्वेकडून संपूर्ण भागाची पाहणी, तसेच रेल्वे रुळावर पडलेल्या स्फोटकांची तपासणी सुरू आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यावर या मार्गावर रोखून धरण्यात आलेली रेल्वेची वाहतूक रुळ दुरुस्त करून पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. स्फोटानंतर मागून येणाऱ्या रेल्वे डुंगरपूर स्थानकात थांबविण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तसेच स्फोटापूर्वी चार तासआधी या मार्गावरून रेल्वे गेल्याचे वृत्त आहे.

ही स्फ़ोटके ज्या पद्धतीने रेल्वे मार्गावर बसविण्यात आली होती, ते पाहता ही स्फोटके पेरण्यासाठी अर्धा तासाचा तरी किमान वेळ लागला असावा. त्यामुळे असा घातपाताचा कट रचणाऱ्यांनी याआधी रेकी केली असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 31 ऑक्टोबरला 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा रेल्वे मार्ग खुला झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या असरवा-उदयपूर एक़्सप्रेसला सिग्नल देऊन या मार्गाचा शुभारंभ केला होता. मात्र अवघ्या दोन आठवड्यांच्या आत या मार्गावर घातपाताचा कट उघड झाल्याने केंद्रीय संघटनाही तपासात सामील झाल्या आहेत.

leave a reply