चीन व रशियाच्या ‘ए2/एडी झोन्स’विरोधात अमेरिका हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करणार

- अमेरिकी संसदेचा अहवाल

हायपरसोनिक क्षेपणास्त्रेवॉशिंग्टन – चीन व रशियाच्या ‘अँटी-ॲक्सेस/एरिआ डिनायल झोन्स’ना (ए2/एडी झोन्स) लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची योजना आखल्याचा दावा अमेरिकी संसदेच्या अहवालात करण्यात आला. अमेरिकी संसदेच्या ‘काँग्रेशनल बजेट ऑफिस’ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात अमेरिकेच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसह इतर प्रगत क्षेपणास्त्रांचा वापर यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यात चीन व रशियाने अमेरिकेचे हल्ले उधळण्यासाठी ‘ए2/एडी झोन्स’ विकसित केल्याचे बजावण्यात आले आहे. हे झोन्स निष्क्रिय करण्यासाठी अमेरिकेला हायपरसोनिक क्षेपणास्त्रे व मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात करावी लागतील, अशी योजना संरक्षण विभागाने तयार केल्याचे संसदीय अहवालात नमूद करण्यात आले.

रशिया-युक्रेन युद्ध आणि चीन व उत्तर कोरियाच्या पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जगभरातील आपली तैनाती पुन्हा वाढविण्यास सुरुवात केली आहे. रशियाकडून युरोपिय देशांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा धोका गृहित धरून अमेरिकेने युरोपमध्ये नवी लढाऊ विमाने व क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी पॅसिफिक क्षेत्रातील जपान, दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्येही अमेरिकेने दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीचे संकेत दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी जपानच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी अमेरिकेकडून मध्यम व लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीबाबत चर्चा केल्याचा दावा जपानी दैनिकाने केला. अमेरिकेच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीलाही जपान अनुकूल असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. 2027 सालापर्यंत जपान अमेरिकेकडून 500 क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकतो. यामध्ये 1000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही समावेश असेल, असा दावा केला जातो.

हे वृत्त अमेरिकेच्या संसदीय अहवालात प्रसिद्ध झालेल्या माहितीला दुजोरा देणारे ठरते. अमेरिकेच्या ‘काँग्रेशनल बजेट ऑफिस’ने संरक्षण विभागाच्या योजनांचा उल्लेख करताना हायपसोनिक क्षेपणास्त्रांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात या क्षेपणास्त्रांचा वापर प्रभावी ठरु शकतो, असे अहवालात सांगण्यात आले आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे रोखणे अशक्य असल्याने त्यांचा वापर महत्त्वाचा ठरतो, असेही ‘काँग्रेशनल बजेट ऑफिस’ने म्हटले आहे.

याच अहवालात, अमेरिकेचे प्रतिस्पर्धी देश असलेल्या रशिया व चीनने ‘अँटी-ॲक्सेस/एरिआ डिनायल झोन्स’ना(ए2/एडी झोन्स) विकसित केले असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. चीनने साऊथ चायना सी क्षेत्रात ‘डीएफ-16’, ‘डीएफ-17 हायपरसोनिक मिसाईल’, ‘डीएफ21-डी’, ‘डीएफ-10ए’ व ‘डीएफ-100 सुपरसोनिक’ यासारखी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. तर रशियाने बाल्टिक तसेच ‘ब्लॅक सी’ क्षेत्रात मठ्या प्रमाणात हायपसोनिक क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे मानले जाते.

English हिंदी

leave a reply