अमेरिकेला अंतर्गत मतभेद व गोंधळलेल्या मानसिकतेचा धोका

- ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील राजकीय व्यवस्था देशांतर्गत पातळीवर एकजूट दाखविण्यात अपयशी ठरली आहे. आपण कोण आहोत व कशाचे प्रतिनिधित्व करतो याबाबत अमेरिकेची मानसिकता गोंधळलेली दिसते. हा गोंधळ व अंतर्गत पातळीवरील मतभेद यापासून अमेरिकेला मोठा धोका आहे’, असा इशारा ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किसिंजर यांनी अमेरिका आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज नसल्याची जाणीवही करून दिली.

‘चीनच्या कारवाया हा जागतिक व्यवस्थेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. त्याचवेळी रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण व इराणकडून विकसित करण्यात येणारी संहारक अस्त्रे हीदेखील मोठी आव्हाने ठरतात. आर्टिफिशल इंटेलिजन्ससारखे तंत्रज्ञान मानवी जाणीवांमध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामर्थ्याबरोबरच सलोख्याचीही गरज आहे’, असे किसिंजर यांनी बजावले. याबरोबरच अनेक मोठी आव्हाने समोर ठाकली असताना अमेरिका अंतर्गत पातळीवर एकत्र येण्यात अपयशी ठरणे योग्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अमेरिकेचे नेतृत्त्व जगाला स्थिर करण्यात योगदान देत असेल तरच अमेरिका समृद्ध व सुरक्षित राहिल. अमेरिका वेगळी पडत असेल तर जग स्थिर राहू शकत नाही, असा दावा माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या किसिंजर यांनी केला. माजी राष्ट्राध्यक्ष रिगन यांनी अमेरिका सामर्थ्यशाली असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, हे जाणले होते अशा शब्दात त्यांनी रिगन यांची प्रशंसाही केली. किसिंजर यांनी यापूर्वीही अमेरिकेतील राजकीय दुफळी व परस्परांमधील टोकाच्या विरोधावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

leave a reply