अमेरिकी जनतेला अजून काही काळ वेदना सहन कराव्या लागतील

- फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – महागाईचा भडका व ती रोखण्यासाठी सुरू असलेली व्याजदरवाढ या पार्श्वभूमीवर अमेरिकी जनतेला अजून काही काळ वेदना सहन कराव्या लागतील, असा इशारा फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी दिला. अमेरिकेत गेल्या वर्षापासून महागाईचा भडका उडाला असून जून महिन्यात महागाई निर्देशांक विक्रमी नऊ टक्क्यांवर गेला होता. ही वाढती महागाई रोखण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक असणाऱ्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने गेल्या पाच महिन्यात चारवेळा व्याजदरात वाढ केली आहे. मात्र त्याने महागाई तसेच अर्थव्यवस्थेत फरक पडला नसून उलट अमेरिकी जनतेचा त्रास अधिकच वाढला आहे.

शुक्रवारी ‘सेंट्रल बँकिंग कॉन्फरन्स’मध्ये केलेल्या भाषणात पॉवेल यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेला लवकरच मंदीचा सामना करावा लागेल, असे संकेत दिले. ‘महागाई रोखण्यासाठी अमेरिकी अर्थव्यवस्थेला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. व्याजदरात वाढ केल्यानंतर विकासदर मंदावणे व मनुष्यबळातील घट याबरोबरच अमेरिकी जनता व उद्योगक्षेत्राला याच्या वेदना सहन कराव्या लागतील’, असे फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नरनी बजावले.

दुर्दैवाने महागाई कमी करण्यासाठी काही किंमत मोजावीच लागते, कारण महागाई नियंत्रणात आली नाही तर मोठ्या वेदनांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही पॉवेल यांनी यावेळी दिला. अमेरिकी जनतेला होणारा त्रास वाढल्यानंतरही महागाई नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत फेडरल रिझर्व्ह आपली धोरणे बदलणार नाही, याची जाणीवही त्यांनी यावेळी करून दिली. जर धोरणे बदलण्याचा प्रयत्न केला त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात हे आपल्याला इतिहासाने दाखवून दिले आहे, असेही पॉवेल यावेळी म्हणाले.

अमेरिकेतील जनता महागाईच्या भडक्याबरोबरच आर्थिक मंदीच्या संकटालाही तोंड देत आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीमध्ये घसरली आहे. तांत्रिकदृष्ट्या सलग दोन तिमाहीमधील घसरण म्हणजे मंदीच ठरते. तरीही बायडेन प्रशासन वेगवेगळी कारणे पुढे करून अमेरिकेत मंदी आलेली नसल्याचे दावे करीत आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन व इतर अधिकारी सातत्याने मंदी आलेली नाही, असे ठासून सांगत असताना, अमेरिकी जनता व उद्योगक्षेत्र मात्र आपण मंदीचा विदारक अनुभव घेत असल्याचे सांगत आहे.

‘स्टायफेल फायनान्शिअल’ या गटाने केलेल्या सर्वेक्षणात अमेरिकी कंपन्यांमधील 90 टक्क्यांहून अधिक अधिकाऱ्यांनी देश मंदीत असल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेतील माजी आर्थिक सल्लागार, अर्थतज्‍ज्ञा तसेच विश्लेषकही आर्थिक मंदीचा इशारा देत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक आघाडीच्या वित्तसंस्थांनीही अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांचे वक्तव्यही त्याला दुजोरा देणारे दिसते. मात्र अमेरिकेत मंदी आल्याचे मान्य केल्या, त्याची फार मोठी राजकीय किंमत आपल्याला द्यावी लागेल, याची जाणीव बायडेन प्रशासनाला झालेली आहे. म्हणूनच मंदी आलेली नाही, हे अमेरिकन जनतेला पटवून देण्यासाठी बायडेन प्रशासन धडपडत आहे. काही काळापूर्वी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेतील महागाईचे खापर युक्रेनचे युद्ध व पर्यायाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर फोडले होते. तर अमेरिकेच्या सदोष धोरणांमुळे या देशावर हे संकट ओढवल्याचा पलटवार रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता.

leave a reply