संतप्त बलोच निदर्शकांनी पाकिस्तानी जवानांना पिटाळून लावले

इस्लामाबाद – बलोचिस्तानातल्या एका प्रांतात चौकी उभारु पाहणाऱ्या पाकिस्तानी लष्करांच्या जवानांना बलोच जनतेच्या संतापाचा सामना करावा लागला. बलोच जनतेचा आवेश पाहून पाकिस्तानी जवानांना तिथून पळ काढावा लागला. या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. गेल्या महिन्यात चार वर्षाच्या बलोच मुलीला तिच्या आईसह हत्या घडवून पाकिस्तानी लष्कराने बलोचींवरील अत्याचाराची परिसीमा गाठली होती. त्यानंतर साऱ्या बलोचिस्तानात पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात अशारीतीने उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे.

Balochपाकिस्तानचे लष्कर बलोच जनतेवर अनिन्वत अत्याचार करीत असून गेल्या काही आठवड्यांपासून याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बलोच नेते, कार्यकर्ते, तरुण व महिला यांचे अपहरण आणि हत्या घडविण्यात येत असून यासाठी पाकिस्तानचे लष्कर आपल्या हस्तकांचा वापर करीत आहे. यामुळे जगभरातील बलोचींच्या संघटना व नेते आवाज उठवित आहेत. यामुळे अस्वस्थ बनलेल्या पाकिस्तानी लष्कराने बलोचींवरील अत्याचाराची परिसीमा गाठल्याचे दिसत आहे. गेल्याच महिन्यात चार वर्षाच्या निष्पाप मुलीची तिच्या आईसह हत्या घडवून पाकिस्तानी लष्कराने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर बलोचींच्या असंतोषाचा भडका उडाला.

जून महिन्याच्या दहा तारखेला बलोचिस्तानच्या एका भागात पाकिस्तानी लष्कराच्या चौकीवर बलोच निर्दशकांनी हजारोंच्या संख्येने हल्ला चढविला. दगडफेक करुन या पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना निदर्शकांनी माघार घेण्यास भाग पाडले. इथून पळ काढून पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी आपला जीव वाचविला. पण लष्कराच्या चौकीला निदर्शकांनी लक्ष्य केले होते. त्याची मोडतोड केली. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्करावरील बलोचींच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बलोचिस्तानचाही बांगलादेश होणार का? असा प्रश्न काही पत्रकार आणि विश्लेषक विचारु लागले आहेत. बलोचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वाधिक खनिजसंपत्तीने संपन्न असलेला हा प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी जवळपास ५० टक्के भूभाग बलोचिस्तान प्रांतात मोडतो. असे असले तरी बलोचिस्तानची लोकसंख्या मात्र इतर प्रांतापेक्षा खूपच कमी आहे. याचा फायदा घेऊन पाकिस्तानचे सर्वच पक्षांचे सरकार आणि लष्करी राजवटीनेही बलोचिस्तानची लूटमार केली. म्हणून बलोच जनता कायम स्वांतत्र्याची मागणी करीत आली आहे. या जनतेचा आवाज दडपण्यासाठी पाकिस्तानने जनतेवर अमानुष बलप्रयोग केला होता. पण आता मात्र या अत्याचारांवर जहाल प्रतिक्रिया येऊ लागली असून स्वातंत्र्यासाठी निर्णायक लढा देण्याची वेळ आल्याचे दावे बंडखोर बलोच नेते करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून यामुळे याचे धाबे दणाणले आहेत.

leave a reply