तालिबानचा पाठिराखा असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात जगभरात संतप्त निदर्शने

पाकिस्तानच्या विरोधातबर्लिन – अफगाणिस्तानचा ताबा घेणाऱ्या तालिबानच्या दहशतवाद्यांना सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या, त्यांचे प्रवक्तेगिरी करणाऱ्या पाकिस्तानविरोधात जगभरात निदर्शने होत आहेत. अफगाणिस्तानातील अराजकासाठी जबाबदार असणारा पाकिस्तान, या देशाचे लष्कर व गुप्तचर संघटनेवर निर्बंध टाका, अशी मागणी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील निदर्शकांनी केली. यामध्ये अफगाणी व पाश्‍चिमात्य देशांमधील जनतेबरोबरच पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनीही सहभाग घेतला, हे विशेष!

गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर ‘सँक्शन पाकिस्तान’ अर्थात पाकिस्तानवर निर्बंध टाका, अशी मागणी करणारा ट्रेंड सुरू आहे. अमेरिका, कॅनडा, भारत, अफगाणिस्तान तसेच खुद्द पाकिस्तानातूनही हा ट्रेंड सुरू आहे. पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी माध्यमांसमोर येऊन ही माहिती दिली होती. सोशल मीडियावरील या अपप्रचारामागे अमेरिका व भारत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या या मंत्र्यांनी केला होता. पण पाकिस्तानातूनच या आरोपांची खिल्ली उडविण्यात आली होती.

रविवारी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानविरोधातील ही निदर्शने सोशल मीडियावरुन रस्त्यावर उतरली आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये पाकिस्तानविरोधात संतप्त निदर्शने झाली. अमेरिका व युरोपिय देशांमध्ये स्थायिक असलेल्या अफगाणींनी या निदर्शनांचे नेतृत्व केले. तर अमेरिका व युरोपिय देशांचे नागरिक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले.

वॉशिंग्टन, लंडन, बर्लिन, ॲडलेड या शहरांमध्ये अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या दूतावासांसमोर ही निदर्शने झाली. तर न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या दूतावासासमोर अफगाणी व अफगाणसमर्थक अमेरिकी नागरिकांनी निदर्शनात सहभाग घेतला होता. बांगलादेशमध्येही पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने झाल्याच्या बातम्या आहेत. तालिबानला आश्रय देणारा, लष्करी सहाय्य करणारा, आंतरराष्ट्रीय स्तरावर या दहशतवादी संघटनेची बाजू घेणारा पाकिस्तान आजच्या अफगाणिस्तानच्या स्थितीसाठी जबाबदार असल्याचा आरोप या निदर्शकांनी यावेळी केला. या निदर्शकांमध्ये पाकिस्तानच्या पश्‍तू, बलोच, सिंधी वंशाचे नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता.

leave a reply