‘जी7′ देशांकडून रशियन सोन्याच्या आयातीवर बंदीची घोषणा

G7-countriesमॉस्को/किव्ह – युक्रेनविरोधात रशियाने छेडलेल्या युद्धामागील आर्थिक कणा मोडण्याचे कारण पुढे करून पाश्चिमात्यांनी रशियाविरोधात नव्या निर्बंधांची घोषणा केली. अमेरिका व ब्रिटनसह जी7 देशांनी रशियन सोन्याच्या आयातीवर बंदी टाकल्याचे जाहीर केले. जर्मनीत जी7 गटाच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच या निर्बंधांची माहिती देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच युरोपातील आघाडीचा देश असणाऱ्या स्वित्झर्लंडने रशियाकडून तीन टन सोने आयात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी सातत्याने रशियावर निर्बंधांचा मारा केला आहे. आतापर्यंत रशियन इंधन, बॅकिंग, मोठे उद्योग, विमानप्रवास, तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यात आता सोन्याचीही भर पडली आहे. रशिया हा सोन्याच्या उत्पादनातील आघाडीचा देश म्हणून ओळखण्यात येतो. सोन्याच्या उत्पादनातील 10 आघाडीच्या कंपन्यांपैकी चार कंपन्या रशियन आहेत. रशियाकडून दरवर्षी 15 अब्ज डॉलर्सहून अधिक सोन्याची निर्यात केली जाते.

G7-Russian-goldत्यामुळे रशियन सोन्याला लक्ष्य करणे महत्त्वाची बाब ठरली आहे. ‘नव्या निर्बंधांमुळे रशियन उद्योजक व पुतिन यांच्या युद्धामागील आर्थिक व्यवस्थेला थेट धक्का बसेल. पुतिन राजवटीला मिळणारा निधी थांबविणे आवश्यक आहे. ब्रिटन व सहकारी देश त्यासाठीच पावले उचलत आहेत’, अशा शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियन सोन्याच्या आयातीवरील निर्बंधांची माहिती दिली. अमेरिकी अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला.

रशियन सोन्याच्या आयातीवरील बंदीची घोषणा होण्यापूर्वी काही दिवस आधी स्वित्झर्लंड या युरोपिय देशाने रशियाकडून तब्बल तीन टन सोने आयात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या सोन्याची किंमत 20 कोटी डॉलर्सहून अधिक आहे. स्विस यंत्रणांनी हे सोने ब्रिटनमधून आयात केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी 2020 साली स्वित्झर्लंडने रशियातून सुमारे 70 कोटी डॉलर्सचे सोने आयात केले होते. ब्रिटन हा रशियन सोन्याचा सर्वात मोठा आयातदार असून 2020 साली ब्रिटनमध्ये सुमारे 17 अब्ज डॉलर्स सोन्याची आयात झाली होती.

leave a reply