भारतात आणखी ७ कोरोना लसी विकसित होत आहेत

- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन - पुढील महिन्यापासून ५० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार

नवी दिल्ली – भारतात आणखी सात कोरोना लसी विकसित केल्या जात आहेत. सध्या दोन कोरोना लसींना वापरासाठी मंजुरी मिळून त्याद्वारे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र एक-दोन लसींवर भारताला विसंबून राहता येणार नाही. प्रत्येक भारतीयापर्यंत लस लवकरात लवकर पोहोचावी यासाठी आणखी लसी विकसित होणे गरजेचे असून यादृष्टीने काम सुरू असल्याच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. तसेच पुढील महिन्यापासून ५० वर्षांवरील नागरिकांचे कारोना लसीकरण सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.

देशात सुमारे ५८ लाख आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना रविवारपर्यंत लस देण्यात आली होती. आतापर्यंत सर्वाधिक कोरोना लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसर्‍या स्थानावर असून लसीकरणाच्या वेगाच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. जास्तीत जास्त लसीकरण झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका आणि ब्रिटन भारताच्या पुढे आहेत.

देशात सध्या ‘ऑक्सङ्गर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’द्वारे लसीकरण होत आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या पाहता भारतात कोरोनामुळे ८० कोटी नागरिक संक्रमित होतील आणि २० लाख जणांचा या साथीत बळी जाईल, असा दावा या साथीच्या सुरुवातीच्या काळात करण्यात येत होता. मात्र भारताने सार्‍या जगाचे अंदाज चुकीचे ठरविल्याचे गेल्याच आठवड्यात पंतप्रधान मोदी म्हणाले होते. तसेच भारतात आणखी कोरोना लसी विकसित होत असून जगाला भारत कोरोना लसींचा पुरवठा करेल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला होता.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महत्त्वाची माहिती दिली. केवळ दोन लसी विकसित करून भारत थांबलेला नाही. कारण भारतासारख्या देशाला दोन लसींवर विसंबून राहता येणार नाही. देशात एक-दोन नव्हे तर आणखी सात लसी विकसित होत आहेत. भारताची प्रचंड लोकसंख्या आणि आवश्यकता पाहता या क्षेत्रात संशोधन होण्याची व यासाठी आणखी काही कंपन्यांची पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे हर्ष वर्धन म्हणाले.

सध्या देशात विकसित तीन लसींच्या सुरुवातीच्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. तर दोन लसी मानवी चाचण्यांपूर्वीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली. तसेच सध्या भारतात मंजुरी मिळालेल्या दोन्ही लसी खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्याची सध्यातरी कोणतीही योजना नसल्याचे हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले. आवश्यकता व परिस्थितीनुसार याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले.

leave a reply