आर्मेनिया-अझरबैजानमधील संघर्षात किमान २०० जण ठार

- अझरबैजानकडून रशियन सुरक्षा यंत्रणेच्या तळावर क्षेपणास्त्रांचे हल्ले

येरेवान/मॉस्को – गेल्या चोवीस तासापासून आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात किमान २०० जण ठार झाले. मंगळवारच्या रात्री अझरबैजानच्या लष्कराने आर्मेनियातील रशियन सुरक्षा यंत्रणेच्या तळावर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याची लक्षवेधी माहिती समोर येत आहे. रशियाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रशियापुरस्कृत लष्करी गट आर्मेनियासाठी रवाना झाल्याचे रशियन माध्यमे सांगत आहेत. तर रशिया, अमेरिका आणि युरोपिय देशांचा समावेश असलेली ‘ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप-ओएससीई’ या गटाचे अधिकारीदेखील आर्मेनियात दाखल झाले आहेत.

सोमवार मध्यरात्रीपासून आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये पेटलेला हा संघर्ष तीव्र होत चालला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेपर्यंत मर्यादित असलेला हा संघर्ष आत्ता नागोर्नो-काराबाख या वादग्रस्त प्रांतातही पेट घेत आहे. आर्मेनियन लष्कराने हल्ल्यांना दिलेल्या उत्तरात अझरबैजानचे किमान ५० जवान ठार झाल्याचा दावा आर्मेनियाच्या सरकारने केला. तर आपल्या लष्कराच्या प्रत्युत्तरात आर्मेनियाचे दीडशेहून अधिक जवान मारले गेल्याचे अझरबैजानची माध्यमे सांगत आहेत. दोन्ही देशांच्या या दाव्याची पुष्टी होऊ शकलेली नाही.

पण आर्मेनियातील वृत्तसंस्थेने बुधवारी फोटोग्राफ्ससह धक्कादायक माहिती उघड केली. अझरबैजानच्या लष्कराने मंगळवारी रात्री आर्मेनियाच्या घेघारकुनिक प्रांतात चढविलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात येथील रशियन सुरक्षा यंत्रणेच्या तळाला लक्ष्य केले. या तळावर रशियन गुप्तचर यंत्रणा ‘फेडरल सर्व्हिस ब्युरो-एफएसबी’ तसेच रशियन जवान तैनात होते. अझरबैजानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याची वेळीच माहिती मिळाल्यामुळे रशियन जवानांना सदर तळ रिकामा केला. पण या हल्ल्यात रशियन तळ, वाहने आणि काही शस्त्रास्त्रांचे जबर नुकसान झाल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला.

अझरबैजानने आर्मेनियन वृत्तसंस्थेने केलेले हे आरोप फेटाळले. पण घेघारकुनिक येथील एफएसबीच्या बॅरेक्स व वाहनांची हल्ल्यानंतर झालेल्या नासधुसीचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाल्यानंतर अझरबैजानची बोबडी वळली आहे. रशिया युक्रेनमधील युद्धात गुंतलेली असल्याचे पाहून अझरबैजानने मार्च महिन्यातच नागोर्नो-काराबाखमधील फारूख भागाचा ताबा मिळवून आर्मेनियावर हल्ले सुरू केले होते. तर ऑगस्ट महिन्यापासून अझरबैजानने आर्मेनियावरील हल्ले तीव्र केल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

अझरबैजानने आर्मेनियातील लष्करी तळावर चढविलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांवर रशियाने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तातडीने ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी टीि ऑर्गनायझेशन-सीएसटीओ’ या लष्करी संघटनेची बैठक घेतली. नाटोप्रमाणे या लष्करी संघटनेतही सदस्य देशावरील हल्ला आपल्यावरील हल्ला मान्य करून युद्ध पुकारता येते आणि आर्मेनिया या संघटनेचा सदस्य देश आहे. मंगळवारच्या बैठकीनंतर रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या या लष्करी गटाचे अधिकारी आर्मेनियासाठी रवाना झाले आहेत.

दरम्यान, अझरबैजानने आर्मेनियावर चढविलेल्या हल्ल्यांना तुर्की, पाकिस्तान यांचे समर्थन मिळत आहे. तर अझरबैजानच्या या हल्ल्यांविरोधात इतर जगही एकत्र येत आहे. भारताने थेट उल्लेख न करता, हल्लेखोर देशाने त्वरित संघर्षबंदी करावी, असे आवाहन केले. तर अमेरिका, फ्रान्सने थेट शब्दात अझरबैजानने आर्मेनियावरील हल्ले थांबविण्याची सूचना केली आहे.

leave a reply