‘स्विच’ ड्रोनसाठी लष्कराचा १४० कोटी रुपयांचा करार

- लडाखमध्ये तैनाती होणार

नवी दिल्ली/मुंबई – लडाखमध्ये अतिउंचीवरील दुर्गम भागातही उडू शकणार्‍या ‘स्विच’ ड्रोनची खरेदी भारतीय लष्कर करणार आहे. यासाठी आयडिया फोर्ज कंपनीबरोबर नुकताच लष्कराने करार केला. मुंबई आयआयटीतून पदवीधर होऊन झाल्यावर स्वत:ची कंपनी स्थापणार्‍या तिघा जणांनी हे ड्रोन विकसित केले असून या ड्रोनच्या निर्यातीचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

भारतीय लष्कराला जोरदार वारे वाहणार्‍या लडाख सारख्या अतिउंचीवरील भागात टेहळणी करू शकतील आणि चांगल्या क्षमतेचे फोटो घेऊन तत्काळ ती माहिती लष्कराच्या नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवू शकतील, अशा ड्रोन्सची आवश्यकता होती. यासाठी लष्करातर्फे मागणी नोंेदविल्यावर काही बड्या कंपन्यांही यामध्ये उत्सुकता दाखविली होती. यामध्ये इस्त्रायलची अग्रगण्य युएव्ही निर्माती कंपनी इलबिट, टाटा ग्रुप, डायनामिक टेक्नोलॉजी लिमिटेड, अ‍ॅस्टेरिया एरोस्पेस आणि व्हिटोल एव्हीएशन यासारख्या कंपन्यांचा समावेश होता. ९ ते १२ कंपन्या हे ड्रोन कंत्राट मिळविण्याच्या प्रयत्नात होत्या.

मात्र यामध्ये आयडीया फोर्जने बाजी मारली आहे. २००७ साली आयडीया फोर्ज टेक्नॉलॉजी या कंपनीची स्थापना मुंबई आयआयटीतील तीन मित्रांनी केली होती. या कंपनीने विकसित केलेले मानवरहीत विमान लष्कराच्या अपेक्षेत खरे उतरले आहे. तसेच या स्पर्धेत सामील इतर कंपन्यांच्या ड्रोनपेक्षा सरस ठरल्यानंतर आयडीया फोर्जच्या ‘स्विच’ ड्रोनची निवड लष्कराने केली. नुकताच यासंदर्भात करार करण्यात आला.

ही ड्रोन विमाने समुद्र सपाटीपासून ४ हजार मीटर उंचीवर सहज उडू शकतील. तसेच साडेसहा किलो वजनाच्या या ड्रोनसाठी धावपट्ट्यांचीही गरज भासणार नाही. कारण ही ड्रोन विमाने हेलिकॉप्टरप्रमाणे व्हर्टिकल उड्डाण करण्यास सक्षम आहेत. ‘स्विच’ ड्रोन सलग दोन तास हवेत उड्डाण करून तत्काळ माहिती पोहोचवू शकतील. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत, तसेच खराब हवामानातही ही ड्रोन्स काम करू शकत असल्याने लष्कराने ‘स्विच’ ड्रोनला पसंती दिली.

या ड्रोन्सवर अतिउच्च क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आले असून २५एक्स ऑप्टिकल इतकी या कॅमेर्‍याची झूम क्षमता आहे. यामुळे जास्त स्पष्ट चित्र उपलब्ध होऊ शकेल. लष्कराला एका वर्षाच्या आत आयडीया फोर्जतर्फे या ड्रोन विमानांचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली.

leave a reply