इराणमध्ये राजकीय विरोधकांची धरपकड

- सुधारणावादी नेते, चित्रपट निर्मात्यांना अटक

धरपकडतेहरान – सर्वोच्चधार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात विधाने करणाऱ्यांची इराणने धरपकड सुरू केली आहे. इराणमधील सुधारणावादी गटाचे नेते मोस्तफा ताजझदेह तसेच दोन चित्रपट निर्मात्यांना रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी ताब्यात घेतले. ताजझादेह आणि त्यांचे समर्थक देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरत असल्याचा ठपका रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी ठेवला आहे. दरम्यान, अणुकराराबाबत अमेरिकेबरोबर फसलेल्या वाटाघाटींसाठी सर्वोच्च धर्मगुरू खामेनी जबाबदार असल्याचा ठपका ताजझादेह यांनी ठेवला होता.

अमेरिका आणि इराण यांच्यात दोहा येथील वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. यासाठी दोन्ही देश एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. बायडेन प्रशासनाने आगामी वाटाघाटीबाबत संमिश्र संकेत दिले होते. तर यापुढे अमेरिकेबरोबर अणुकराराबाबत वाटाघाटी शक्य नसल्याचा दावा इराणने केला होता. त्यामुळे येत्या काळात पाश्चिमात्य देश आपल्या देशाची कोंडी करतील, अशी चिंता व्यक्त करून इराणमधील काहीजणांनी अमेरिकेबरोबरील चर्चेतील अपयशामागे खामेनी असल्याचा ठपका ठेवला आहे.

इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खातामी यांच्या सरकारमध्ये अंतर्गत सुरक्षेचे उपमंत्री असलेले मोस्तफा ताजझादेह यांनी यासाठी सर्वोच्च नेते खामेनी यांना जबाबदार धरले. ‘देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, देश सामाजिक असंतोषाचा सामना करीत आहे. अशावेळी अणुकरार पुनर्जिवित करण्यात आलेल्या अपयशामुळे विनाशकारी परिणाम संभवतात. याची सर्वस्वी जबाबदारी देशाच्या सर्वोच्च नेत्यावर आहे’, अशी जळजळीत टीका ताजझादेह यांनी केली.

इराणमधील सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याकडे देशाचे सर्वाधिकार आहेत. त्यांच्या हाती असलेल्या या अमर्याद अधिकारांमुळे खामेनी यांच्यावर टीका करणे सोपे नाही. इराणमध्ये सध्या महागाई भडकली असून बेरोजगारीची समस्या भयंकर बनली आहे. त्यातच पाणीटंचाईने इराणच्या काही भागांना ग्रासले आहे. अशा स्थितीतही सर्वाधिकार हाती असलेले सर्वोच्च धर्मगुरू खामेनी यांच्यावर थेट टीका करण्याचे धाडस सहसा कुणाकडून दाखविले जात नाही. सोशल मीडियावरही काहीजण इराणचे सरकार व यंत्रणांवर या अपयशाचे खापर फोडत आहेत. पण ताजझादेह यांनी सोशल मीडियावर उघडपणे सर्वोच्च नेत्यांवर आरोप केले.

यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने ताजझादेह तसेच मोहम्मद रसौलोफ आणि मोस्ताफा अल-अहमद या चित्रपट निर्मात्यांना देखील अटक केली. इराणच्या सुरक्षेसाठी धोका ठरल्याचा आरोप करून या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. रसौलोफ आणि अहमद यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर आरोप केले होते. इराणच्या सुरक्षा यंत्रणा आपल्याच जनतेविरोधात कारवाई करीत असल्याचा ठपका रसौलोफ आणि अहमद यांनी ठेवला होता.

दरम्यान, गेल्या वर्षीही इराणमध्ये निदर्शने झाली होती. इराणची राजधानी तेहरानसह 20 हून अधिक शहरांमध्ये या निदर्शनांची आग भडकली होती. यामध्ये इराणी विद्यार्थींपासून शिक्षक, कामगार, व्यापारी वर्गाचाही समावेश होता.

leave a reply