आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे आण्विक विध्वंस घडेल

ऑस्ट्रेलियन संसद सदस्याचा इशारा

ॲडलेड – ‘आपण विचारही करू शकत नाही, अशी सकारात्मक क्रांती आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात एआय जगात घडवून आणू शकते. पण याच एआयने मानवी बुद्धिमत्तेची कक्षा ओलांडली, मानवाच्या ध्येयाशी जुळवून घेतले नाही तर ते मानवतेसाठी धोकादायक ठरेल. त्यामुळे मानवाने वेळीच या एआयवर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. अन्यथा एआयच्या बुद्धिमत्तेचा विस्फोट झाला तर विज्ञान, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सामाजिक स्तरावर प्रगती करून सारे काही बदलू शकतात. एआयमुळे आण्विक विध्वंस, सर्वंकष विनाशही घडेल’, अस इशारा ऑस्ट्रेलियन संसद सदस्य ज्युलियन हिल यांनी दिला.

AI Nuke Devastationगेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून एआयवर आधारीत सॉफ्टवेअरच्या सहाय्याने प्रश्नांची उत्तरे तसेच निबंध तयार केले जात असल्याचे उघड होत आहे. ऑस्ट्रेलियातील शिक्षण क्षेत्रात ही मोठी चिंतेची बाब ठरत आहे. अशा सॉफ्टवेअरमुळे परिक्षांना अर्थ उरणार नाही, मेहनतीची सवय न उरलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती खुंटेल, असा दावा केला जात आहे. याचा थेट परिणाम ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण व्यवस्थेवर होईल, असा इशारा दिला जात आहे. दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

संसद सदस्य ज्युलिअन हिल यांनी यासाठी सदर सॉफ्टवेअरचाच वापर करून तयार केलेले भाषण संसदेत मांडले. यामध्ये एआयच्या वापरामुळे होणारे फायदे जगभरातील मानवतेसाठी चांगले असल्याचे हिल म्हणाले. औद्योगिक क्षेत्राबरोबर आरोग्य, वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक क्षेत्रात एआयचा वापर फायद्याचाच ठरत आहे. पण एआयवर आधारीत अशा चॅटबोट सॉफ्टवेअरचा वापर वाढला तर देशांच्या सुरक्षेसमोर मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात, याची जाणीव हिल यांनी करुन दिली. एआयमुळे बेरोजगारांची संख्या वाढू शकते, सायबर हल्ले आणि अपप्रचारासाठी देखील याचा वापर होऊ शकतो, असा इशारा संसदसदस्य हिल यांनी दिला.

एआरवर आधारीत या सॉफ्टवेअरचा वापर रोखायचा असेल, राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका टाळायचा असेल तर यासंबंधीचा व्हाईट पेपर अर्थात श्वेतपत्रिका तयार करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये एआयपासून असलेले फायदे व धोके अधोरेखित करून त्यावर काम करणे आवश्यक असल्याचे आवाहन ज्युलियन हिल यांनी केले.

leave a reply