‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मुळे आण्विक संकट उभे राहील

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अहवालातील इशारा

वॉशिंग्टन – तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असली तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यातही वाढ झाली आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगासमोर आण्विक संकट उभे राहू शकते, असा इशारा स्टॅनफोर्ड विद्यापीठाने आपल्या नव्या अहवालातून दिला. गेल्या दशकभरात या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि झगड्यांचे प्रमाण २६ पटींनी वाढल्याचेही या अहवालात म्हटले आहे. स्मार्ट आर्टिफिशल इंटेलिजन्सची प्रगती रोखली नाही तर मानवजातीचा विनाश अटळ असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांनीच दहा दिवसांपूर्वी केला होता.

AI Nuclear Warआर्टिफिशल इंटेलिजन्सच्या सहाय्याने कुठल्याही प्रश्नाची उत्तरे सापडू शकतात. दशकभरापूर्वी हे सारे अकल्पनीय होते’, अशा शब्दात स्टॅनफोर्ड विद्यापीठाने आपल्या अहवालात या तंत्रज्ञानाचे कौतूक केले. पण त्याचबरोबर या अतिप्रगत तंत्रज्ञानाकडून असलेल्या धोक्याकडेही लक्ष वेधले. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स भ्रमिष्ट होऊ शकतात. हे तंत्रज्ञान पक्षपाती निर्णय घेऊ शकते आणि कुठल्याही कुटील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी फसविले जाऊ शकतात. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाची तैनाती मोठ्या समस्या निर्माण करू शकते’, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

या अहवालासाठी ‘एआय’च्या क्षेत्रातील ३२७ तज्ज्ञांची मते घेण्यात आली. यापैकी ३६ टक्के अर्थात एक तृतियांशहून अधिक जणांनी ‘एआय’मुळे आण्विक संकटासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मान्य केले. ‘एआय’ची निर्मिती मानवाच्या विनाशाचीच केल्याचे यातील काही तज्ज्ञांना वाटत आहे. तर या तंत्रज्ञानामुळे समाजात क्रांतीकारी बदल होतील, असे उर्वरित जणांना वाटत आहे. पण एआय क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच सामान्य अमेरिकन जनतेने देखील, सुमारे ३५ टक्के जणांनी या तंत्रज्ञानाबाबत चिंता व्यक्त केली. देशविघातक कारवायांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

एआय कशाप्रकारे आण्विक संकट निर्माण करील, याबाबत या अहवालात स्पष्टपणे मांडण्यात आलेले नाही. पण एआयचा वापर करून ‘न्युक्लिअर फिझन’ करता येऊ शकते, यासाठी या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. ही सर्वात गंभीर बाब ठरू शकते, असे यात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात कुतूहलाचा तसेच गंभीर चर्चेचा विषय ठरलेले आणखी एक प्रगत तंत्रज्ञान आणि एआय, हे अतिशय धोकादायक संयोग ठरतील, अशी भीती यात व्यक्त करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी एआय क्षेत्रातील तज्ज्ञ एलिझर युडकोवस्की यांनी देखील एआयबाबत असाच इशारा दिला होता. कुठल्याही कारणासाठी मानवाने ‘सुपरह्युमन’प्रमाणे बुद्धिमत्ता असणारा ‘स्मार्ट आर्टिफिशल इंटेलिजन्स’ विकसित केलाच, तर पृथ्वीवरील मानवजातीचा विनाश अटळ असेल. ही बाब शक्याशक्यतेच्या पातळीवरील नाही’, असे एलिझर युडकोवस्की यांनी बजावले होते. ही भयाण शक्यता लक्षात घेऊन आर्टिफिशल इंटेलिजन्सवरील काम आहे तिथेच थांबवण्यावाचून गत्यंतर नाही, असे आवाहन युडकोवस्की यांनी केले होते.

तर गेल्याच महिन्यात अमेरिकास्थित ‘फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूट’ या अभ्यासगटाने आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रातील धोक्यांबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून खुले पत्र लिहिले होते. यात आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात सुरू असणारे मोठे प्रयोग व संशोधन सहा महिन्यांसाठी थांबविण्यात यावे, असे आवाहन केले होते. यावर हजाराहून अधिक संशोधक, वैज्ञानिक, उद्योजक, विचारवंत व राजकीय नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यात ‘टेस्ला’चे प्रमुख एलॉन मस्क व ॲपलचे सहसंस्थापक स्टिव्ह वॉझ्निअक यांचा समावेश होता.

leave a reply