‘एनएससीएन’च्या हल्ल्यात आसाम रायफलचा जवान शहीद

इटानगर – अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यात ‘एनएससीएन(आयएम)’च्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफलचा जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी संघटनांचे हल्ले वाढले असून त्यांना चीनकडून सहाय्य मिळत असल्याचे समोर येत आहे.

‘एनएससीएन'च्या हल्ल्यात आसाम रायफलचा जवान शहीदभारत-म्यानमार सीमेवर गस्त घालून माघारी येत असताना तिरपा जिल्ह्यातील सानलियम गावाजवळ आसाम रायफलच्या गस्ती पथकावर ‘एनएससीएन’च्या अतिरेक्यांनी हल्ला केला. ही घटना सकाळी ७ ते ८ दरम्यान घडली. ‘एनएससीएन’ कडून जवानांवर करण्यात आलेल्या हा या महिन्यातील दुसरा हल्ला आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी अतिरेक्यांनी आसाम रायफलच्या जवानांवर हल्ला केला होता.

ईशान्य भारतात सुरक्षदलांच्या जवानांवर हल्ले करून अतिरेकी म्यानमार व बांगलादेश सीमेत पळून जातात. मात्र गेल्या दोन वर्षात बांगलादेश आणि म्यानमारमधील या अतिरेकी संघटनांचे तळ तेथील यंत्रणा व लष्कराच्या मदतीने नष्ट करण्यात आल्या. तर काही अतिरेकी संघटना आणि त्यांचे प्रमुख नेते शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात आले आहेत.

मात्र अद्याप काही अतिरेकी संघटना हिंसेचा मार्ग सोडण्यास तयार नाहीत. तसेच भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांचे हल्ले वाढले असल्याचे दिसत आहे. ईशान्य भारतात अतिरेकी कारवायांना चीनकडून मोठ्या प्रमाणात सहाय्य मिळत आहे. ‘नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड- खापलांग’ (एनएससीएन-के) या संघटनेसह ईशान्य भारतातील काही अतिरेकी गट म्यानमारमध्ये एकत्र आले आहेत. हे अतिरेकी भारतीय सुरक्षादलांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे.

leave a reply