आसाम,अरुणाचल आणि मेघालयला पुराचा फटका – अरुणाचलमध्ये तिघांचा बळी

दिसपूर – आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांना पुराचा फटका बसला असून अरुणाचलधल्या भूस्खलनात तीन जणांचा बळी गेला आहे. ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या तिन्ही राज्यातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. या राज्यांमधील अडीच लाख जण विस्थापित झाले असून ३५० गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ आणि ‘स्टेट डिझास्टर फोर्स’ने या क्षेत्रात बचावकार्य सुरु केले आहे.

आसाममध्ये सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात ब्रम्हपुत्रेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आसाममध्ये पूर आला आहे. यामुळे आसामच्या सात जिल्ह्यांमधील दोन लाख जण विस्थापित झाली आहेत. यातील नऊ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून आसाममध्ये ३५ रिलिफ कँम्पस् उभारली आहेत. तर या पुराने आसामची १००७ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. तर आसाममधल्या हजारो प्राण्यांना याचा फटका बसला आहे. आधीच आसाम कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करीत आहे. त्यात आसामसमोर पुराचे नवे संकट खडे ठाकले.

अरुणाचलमधल्या काही गावांना पुरासह भूस्खलनाचा फटका बसला आहे. इथल्या भूस्खलनात तीन जणांचा बळी गेला असून यात महिला आणि तिच्या दोन मुलांचा समावेश आहे. अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करुन मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांचे सहाय्य जाहीर केले. तर मेघालयमधल्या ११ गावांना पुराचा फटका बसला असून लाखो जण यामुळे विस्थापित झाली आहेत. तिथली काही घरे वाहून गेली आहेत. मेघालय सरकारने या सर्वांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वेगाने पावले उचलली आहे. पुढचे तीन दिवस ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यात ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे चिंता वाढल्या आहेत.

leave a reply