‘जुलै 4 वीकेन्ड’च्या हिंसाचारामध्ये अमेरिकेत 150 जणांचा बळी

150 जणांचा बळीवॉशिंग्टन – शुक्रवार 2 जुलै ते रविवार 4 जुलै या 72 तासांच्या अवधीत अमेरिकेत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुमारे 150 जणांचा बळी गेला आहे. न्यूयॉर्क, शिकागो, अटलांटा, टेक्सास, व्हर्जिनिया, ओहिओ, डलास अशा विविध भागांमध्ये हिंसाचाराच्या सुमारे 400 घटना घडल्याची माहिती ‘द गन व्हायोलन्स अर्काइव्ह’ या अभ्यासगटाने दिली. गेल्याच महिन्यात अमेरिकेतील पोलीस अधिकारी व विश्‍लेषकांनी हिंसाचारात वाढ होईल, असा इशारा दिला होता.

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये गोळीबाराच्या 21 घटना घडल्या असून त्यात 26 जणांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी न्यूयॉर्कमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती न्यूयॉर्कच्या पोलीस विभागाने दिली. शिकागो शहरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 16 जणांचा बळी गेला असून 70हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिकागोतील बळींमध्ये ‘आर्मी नॅशनल गार्ड’चा जवानाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

150 जणांचा बळी‘द गन व्हायोलन्स अर्काइव्ह’ने दिलेल्या माहितीनुसार, 72 तासांमध्ये ‘मास शूटिंग’च्या 18 घटना घडल्या असून त्यात 18 जणांचा बळी गेला आहे. 72 तासांमध्ये घडलेल्या ‘गन व्हायोलन्स’च्या घटना अमेरिकेतील स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे संकेत आहेत, असा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सुमारे वर्षभराच्या कालावधीत अमेरिकेतील हिंसाचाराच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाली होती.

मात्र आता अमेरिकेतील अनेक प्रांतांमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिंसेच्या घटना वाढू लागल्याचे अजब कारण काहीजणांकडून दिले जात आहे.

150 जणांचा बळीअमेरिकेतील वाढत्या हिंसाचारामागे ‘डिफंड पोलीस’सारख्या मोहिमा, राजकीय स्तरावरील तीव्र मतभेद आणि बंदुकांच्या खरेदीत सातत्याने होत असलेली वाढ, या गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. ‘डिफंड पोलीस’ मोहीम व पोलिसांवर मोठ्या प्रमाणात होणारे आरोप यामुळे अनेक पोलिसांनी राजीनामे दिले आहेत. कोरोनाच्या साथीतही अनेक पोलिसांचा बळी गेला आहे. त्यामुळे पोलिसदलाला मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे.

या वर्षात झालेल्या ‘गन व्हायोलन्स’च्या घटनांमुळे आतापर्यंत 10 हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती ‘द गन व्हायोलन्स अर्काइव्ह’ या अभ्यासगटाने दिली आहे. अवघ्या तीन दिवसात ‘गन व्हायोलन्स’मुळे गेलेल्या दीडशे बळींनंतर अमेरिकेत पुन्हा एकदा ‘गन कंट्रोल’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

leave a reply