फ्रान्सच्या नीसपाठोपाठ लिऑनमध्ये धर्मोपदेशकावर जीवघेणा हल्ला

लिऑन/पॅरिस – फ्रान्सच्या नीस शहरात प्रार्थनास्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापाठोपाठ लिऑन शहरात हल्ला झाल्याचे समोर आले. शनिवारी दुपारी करण्यात आलेल्या या हल्ल्यात प्रार्थनास्थळाबाहेर पडणाऱ्या धर्मोपदेशकांना लक्ष्य करण्यात आले. हल्लेखोराने ग्रीक वंशाच्या धर्मोपदेशकांवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून धर्मोपदेशकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. दरम्यान, नीसमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हल्लेखोराव्यतिरिक्त दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच सुरक्षयंत्रणांनी सांगितले.

फ्रान्सच्या नीसपाठोपाठ लिऑनमध्ये धर्मोपदेशकावर जीवघेणा हल्लाफ्रान्सच्या लिऑन शहरात दुपारी चारच्या सुमारास धर्मोपदेशक निकोलास कॅकावेलाकी प्रार्थनास्थळाचे दरवाजे बंद करीत होते. त्यावेळी हल्लेखोराने हातातील ‘हंटर गन’च्या सहाय्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोराने पळ काढला. काही तासांनी हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. मात्र हल्लेखोराची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. हल्ल्याचे कारण अद्याप कळले नसून सुरक्षायंत्रणांनी हत्येचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लिऑनमधील हल्ल्यानंतर शहरातील इतर प्रार्थनास्थळांच्या प्रमुखांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टे यांनी, देशातील सर्व प्रार्थनास्थळे व शाळांमध्ये लवकरच लष्करी जवान तैनात करण्यात येतील, असे स्पष्ट केले. नीस तसेच लिऑनमध्ये झालेल्या हल्ल्यांदरम्यान त्या प्रार्थनास्थळांबाहेर सुरक्षा तैनात नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. सध्या फ्रान्सच्या विविध भागात दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी तीन हजार लष्करी जवान तैनात असून त्यांची संख्या सात हजारांपर्यंत वाढविण्याचे आश्वासन राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिले आहे. दरम्यान, नीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी फ्रेंच यंत्रणांनी हल्लेखोराव्यतिरिक्त दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

फ्रान्सच्या नीसपाठोपाठ लिऑनमध्ये धर्मोपदेशकावर जीवघेणा हल्लालिऑनमधील हल्ल्याचा ग्रीसच्या परराष्ट्र मंत्रालयासह युरोपियन कौन्सिल तसेच संसदेने निषेध केला आहे. ग्रीक धर्मोपदेशकांवर झालेला हल्ला भयानक असून याप्रकरणी आम्ही फ्रेंच यंत्रणांच्या संपर्कात आहोत, असे ग्रीसच्या परराष्ट्र विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. युरोपियन कौन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल यांनी, लिऑनमधील हल्ला घृणास्पद असल्याची टीका केली आहे. युरोपिय संसदेचे अध्यक्ष डेव्हिड सॅसोली यांनी, युरोप हिंसाचार व दहशतवादासमोर कधीच झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

leave a reply