इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ले चढविल्यास विपरित परिणाम होतील

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इस्रायलला इशारा

विपरित परिणामवॉशिंग्टन/मनामा/जेरूसलेम – इराणच्या अणुकार्यक्रमावर इस्रायलने हल्ला चढवलाच, तर त्याचे अगदी विपरित परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला. अमेरिका इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी उत्सुक असून यासाठी वाटाघाटी सुरू करण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. पण इस्रायल मात्र सदर अणुकरार व यावरील वाटाघाटींचा वापर करून इराण अण्वस्त्रसज्ज्ज होईल, असे बजावत आहे. म्हणूनच अमेरिकेचा पाठिंबा नसला तरी एकतर्फी कारवाई करून इस्रायल इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ले चढविण्याचे संकेत देत आहे. त्यावर बायडेन प्रशासनाची ही प्रतिक्रिया आली आहे.

‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या बातमीत अणुकराराची शक्यता मावळत चालल्याचा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदावर असताना २०१५ सालच्या अणुकरारातून माघार घेईपर्यंत इराणने सर्व निकषांचे पालन केले होते, असे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. ट्रम्प यांनी अणुकरारातून माघार घेतल्यानंतर मात्र इराणने अणुकार्यक्रमाचा वेग वाढविला.

गेल्या दीड वर्षात इस्रायलने अणुप्रकल्पांवर चढविलेल्या हल्ल्यानंतर इराणने नवी यंत्रणा बसवून अधिक वेगाने युरेनियमचे संवर्धन सुरू केल्याचा दावा या वर्तमानपत्राने अमेरिकी अधिकार्‍याच्या हवाल्याने केला. यापुढेही इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविले तर त्याचे विपरित परिणाम होतील, असे अमेरिकी अधिकारी बजावत असल्याची माहिती या वर्तमानपत्राने दिली.

ही माहिती देणार्‍या अमेरिकी अधिकार्‍यांचे नाव उघड करण्याचे या वर्तमानपत्राने टाळले. पण रविवारी बाहरिनमध्ये पार पडलेल्या ‘मनामा डायलॉग’च्या बैठकीत इराणबरोबरील अणुकराराबाबत अमेरिका व इस्रायलमध्ये असलेले मतभेद अधिक स्पष्टपणे समोर आले. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एयल हुलाता आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आखातासाठी नियुक्त केलेले विशेषदूत ब्रेट मॅक्गर्क यांच्यातील विसंवाद यावेळी जगजाहीर झाला.

‘आंतरराष्ट्रीय समुदाय इराणच्या विरोधात ठामपणे उभा राहिलल्या इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणे सोपे होईल. येत्या काळात तशीच आवश्यकता वाटली तर इस्रायलने इराणच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी ठेवलेली आहे’, असे इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे माजी एजंट असलेल्या हुलाता मनामा येथील बैठकीत म्हणाले.

पण अमेरिकेचे विशेषदूत मॅक्गर्क यांनी इराणवरील लष्करी कारवाईवरून इस्रायलला इशारा दिला. ‘अमेरिका व्हिएन्ना येथील वाटाघाटीवर लक्ष केंद्रीत करीत असून राजनैतिक वाटाघाटी यशस्वी ठरतील’, असा विश्‍वास मॅक्गर्क यांनी व्यक्त केला. जर या वाटाघाटी अपयशी ठरल्या तरच बायडेन प्रशासन इतर पर्यायांचा विचार करील. त्याच्या आधी केलेल्या लष्करी कारवाईने इराणच्या अणुकार्यक्रमाचे नुकसान होईल खरे, पण त्याने इराणच्या वर्तनात बदल होणार नसल्याचे सांगून मॅक्गर्क यांनी बायडेन प्रशासनानची भूमिका मांडली.

इराणवरील कारवाईसाठी अमेरिकेकडून पाठिंबा मिळणार नसल्याचे इस्रायलने गृहित धरले आहे. या मुद्यावर इस्रायलचे आपल्या सर्वोत्तम मित्रदेशाबरोबर वाद होतील, अशी शक्यता पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी वर्तविली. पण काही झाले तरी इस्रायल अणुकराराचे समर्थन करणार नाही आणि त्याला बांधिल नसेल, असे पंतप्रधान बेनेट यांनी ठणकावले आहे.

leave a reply