बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंकेचाही भारतीय लसींवर विश्‍वास

नवी दिल्ली – म्यानमारच्या काउन्सिलर अँग सॅन सू की यांनी आपल्या देशवासीयांशी संवाद साधला. नवीन वर्षानिमित्ताने देशवासीयांशी संवाद साधताना सू की यांनी मोठी घोषणा केली आहे. आपल्या देशाला भारताकडून कोरोनाची लस पुरवठा होणार आहे. या लसीच्या खरेदीसाठी भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटबरोबर करारही झाल्याचे सू की यांनी म्हटले आहे. नुकताच म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सू की यांचा पक्ष मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेवर आला आहे. गेल्यावर्षी भारताचे लष्करप्रमुख आणि परराष्ट्र सचिव म्यानमार दौर्‍यावर गेले होते. त्याचवेळी लस तयार झाल्यावर म्यानमारला त्याचा पुरवठा करण्याला भारताचे प्राधान्य असेल, अशी ग्वाही भारतातर्फे देण्यात आली होती.

बांगलादेशनेही कोरोनाविरोधात लढाईत भारतीय लसींवर विश्‍वास दाखविला आहे. भारताने नेपाळला कोरोनावरील लसींच्या पुरवठ्याचे आश्‍वासन दिले आहे. भारताने कोरोना लसीच्या निर्यातीवर घातलेली बंदी बांगलादेशसाठी लागू नसेल, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के.अब्दुल मोमेन यांनी नुकतेच जाहीर केले होते.
तसेच श्रीलंकेनेही भारतीय लसीलाच प्रधान्य दिले आहे. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुनवर्धना यांनी श्रीलंका भारताकडून लस मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाविरोधात वेळेत औषधे उपलब्ध करून देऊन भारत श्रीलंकेला सहाय्य करील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

शेजारी देशांना लसींच्या पुरवठ्यामुळे भारताचे ‘नेबर फर्स्ट’ हे धोरण अधिकच मजबूत झाले असून भारताचा प्रभावही यामुळे वाढणार असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply