बायडेन प्रशासन व्हेनेझुएला व क्युबावरील निर्बंध शिथिल करणार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीत व्हेनेझुएला व क्युबावर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मदुरो यांच्या राजवटीविरोधात जबर आर्थिक व राजनैतिक निर्बंध लादले होते. तर क्युबाच्या राजवटीवर मानवाधिकारांचे कारण पुढे करून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर रशियाने या देशांनी असलेले आपले संबंध अधिक मजबूत करण्यात यश मिळविले होते. आता रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाने रशियाला समर्थन देणाऱ्या देशांना आपल्या बाजूने वळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हे त्यासाठी दाखविलेले आमिष असल्याचे मानले जाते.

व्हेनेझुएलातील आघाडीची इंधन कंपनी ‘पीडीव्हीएसए’वरील आर्थिक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. याचा थेट फायदा अमेरिकी इंधनकंपनी ‘शेव्हरॉन कॉर्प’ला होईल, असे सांगण्यात येते. रशियावरील निर्बंधांमुळे सध्या अमेरिकेतील इंधनाचे दर कडाडले असून ते नियंत्रणात आणण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलासारख्या इंधनसंपन्न देशाशी संबंध पूर्ववत करून अमेरिकेतील इंधनाची समस्या दूर करण्यासाठी बायडेन प्रशासनाची धडपड सुरू असल्याचे दिसते.

व्हेनेझुएलाच्या कंपनीवरील निर्बंध शिथिल करण्याबरोबरच ‘पीडीव्हीएसए’चे माजी वरिष्ठ अधिकारी व मदुरो यांचे निकटवर्तिय असणाऱ्या कार्लोस एरिक माल्पिका-फ्लोरेस यांनाही अमेरिकी निर्बंधांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. मदुरो राजवट व अमेरिकेदरम्यान संबंध सुधारून चर्चा सुरू व्हावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येते. कार्लोस यांचे नाव वगळण्यात आले असले तरी मदुरो यांच्यासह 140 नेते व अधिकाऱ्यांवर निर्बंध कायम ठेवण्यात येत असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कारकिर्दीत क्युबावरील निर्बंध उठविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बायडेन यांनी ओबामा यांच्या निर्णयाची पुनरावृत्ती केली आहे. अमेरिकेतून क्युबात धाडण्यात येणाऱ्या निधीवरील मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्याचवेळी क्युबातून अमेरिकेत येणाऱ्या चार्टर फ्लाईट्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. क्युबन नागरिकांच्या व्हिसाची प्रक्रियाही वेगवान करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयाचे क्युबाने स्वागत केले असले तरी अमेरिकेतून मात्र टीकेची झोड उठली आहे.

बायडेन यांच्या सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील वरिष्ठ संसद सदस्य बॉब मेनेडेझ यांनी निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवास व इतर निर्बंध शिथिल करून क्युबात लोकशाही प्रस्थापित होईल, असे मानणारे त्यांचे चुकते आहे हे मान्यच करायला तयार नाहीत, या शब्दात त्यांनी बायडेन प्रशासनाच्या निर्णयावर कोरडे ओढले. रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य मार्को रुबिओ यांनी, बायडेन प्रशासनाचा निर्णय ओबामा यांच्या अपयशी धोरणाची पुनरावृत्ती असल्याचा ठपका ठेवला आहे.

leave a reply