इस्रायलपेक्षा युएईला इराणपासून सर्वाधिक धोका

- मोसादच्या माजी प्रमुखांचा इशारा

धोकाअबू धाबी – इराणपासून इस्रायलच्या सुरक्षेला जितका धोका आहे, त्याहून अधिक प्रमाणात युएईच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचे माजी प्रमुख योसी कोहेन यांनी दिला. त्याचबरोबर या धोक्याचा सामना करण्यासाठी या क्षेत्रातील देशांना एकजूट करावी लागेल, असे आवाहन कोहेन यांनी अबू धाबी येथील एका बैठकीतून केले.

युएईची राजधानी अबू धाबी येथे ‘बियॉंड बिझनेस’ या व्यापारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इस्रायल व युएईच्या शेकडो व्यापारांनी सहभाग घेतला. दोन्ही देशांमधील अब्राहम कराराला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सदर बैठक आयोजित केले होती. यामध्ये इस्रायलची गुप्तचर यंत्रणा योसी कोहेन देखील उपस्थित होते.

इस्रायल व अरब देशांमधील अब्राहम करारासाठी कोहेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या बैठकीत कोहेन देखील सहभागी होते, असे बोलले जाते. या बैठकीत बोलताना इस्रायल व युएई परस्पर व्यापार वाढवून या क्षेत्राचा विकास घडवू शकतात, असा दावा कोहेन यांनी केला. तर या क्षेत्राच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याबाबत बोलताना कोहेन यांनी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचा उल्लेख केला.

इस्रायलपेक्षा युएईच्या सुरक्षेला इराणपासून सर्वाधिक धोका असल्याचे कोहेन म्हणाले. याआधी युएईच्या स्थैर्याला इराणकडून धोके निर्माण करण्यात आले होते. पण अजूनही इराणकडून असलेला धोका टळलेला नाही. इराण तसेच इराणशी संलग्न असलेल्या हिजबुल्लाह, हमास आणि इस्लामिक जिहाद यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांकडून युएईच्या सुरक्षेला धोका असल्याचे कोहेन म्हणाले. इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून असलेल्या या धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायल, युएई तसेच या क्षेत्रातील इतर देशांना एकजूट करावी लागेल, असे कोहेन यांनी अधोरेखित केले.

leave a reply