युक्रेनच्या अमेरिकापुरस्कृत प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रांची निर्मिती सुरू होती

- रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा गंभीर आरोप

मॉस्को – ‘सोव्हिएत रशियामधून बाहेर पडलेल्या देशांमध्ये अमेरिकेचे पेंटॅगॉन लष्करी जैविक मोहीम राबवित असल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने याआधीही लक्षात आणून दिले होते. युक्रेनमध्ये देखील अशा ३० प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर काम सुरू होते. युक्रेनमधील या प्रयोगशाळांना अमेरिकेकडून पैसा पुरविला जात होता. रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला, त्याच दिवशी या प्रयोगशाळांमधील जैविक शस्त्रांबाबतचे सारे पुरावे नष्ट करण्यात आले’, असा गंभीर आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

जैविक शस्त्रांची निर्मितीगेल्या बारा दिवसांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियाने मानवाधिकारांचे उल्लंघन केल्यो आरोप अमेरिका व पाश्‍चिमात्य देश करीत आहेत. युक्रेनचा ताबा घेण्यासाठी रशिया हे हल्ले चढवित असल्याचा ठपका पाश्‍चिमात्य देश व माध्यमांनी ठेवला आहे. पण रशियन लष्कराने गेल्या दोन दिवसांपासून युक्रेनवरील हल्ल्यांबाबत नवी माहिती उघड करण्याचे सत्र सुरू केले.

जैविक शस्त्रांची निर्मिती

रशियन लष्कराच्या ‘रेडिएशन, केमिकल अँड बायोलॉजिकल डिफेन्स फोर्सेस’चे प्रमुख इगोर किरीलोव्ह यांनी युक्रेनमधील प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रांवर संशोधन व त्यांची निर्मिती सुरू होती, असा आरोप केला. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनची ‘डिफेन्स थ्रेट रिडक्शन एजन्सी-डिटीआरए’ आणि ‘ब्लॅक अँड वेच’ ही खाजगी कंपनी युक्रेनमधील या प्रयोगशाळांशी जोडलेले असल्याचा दावा किरीलोव्ह यांनी केला. गेल्या वर्षी, २०२१ साली पेंटॅगॉनने युक्रेनमधील या प्रयोगशाळांना एक कोटी, १८ लाख डॉलर्सचा निधी पुरविला होता, असेही किरीलोव्ह पुढे म्हणाले.

जैविक शस्त्रांची निर्मितीयुक्रेनमधील रशियाच्या विशेष लष्करी कारवाईनंतर ही माहिती समोर आल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेंकोव्ह यांनी सांगितले. रशियन संरक्षण मंत्रालयाने नकाशासह युक्रेनमधील या प्रयोगशाळांची माहिती प्रसिद्ध केली. तसेच युक्रेनमधील ३० प्रयोगशाळांना लष्करी जैविक मोहिमेसाठी पेंटॅगॉनने निधी पुरविल्याचे पुरावे सापडल्याचे कोनाशेंकोव्ह म्हणाले. युक्रेनमधील अमेरिकेच्या दूतावासात यासंबंधीचे लिखित पुरावे होते. पण २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला त्याच दिवशी अमेरिकन दूतावासातील कर्मचार्‍यांनी हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोनाशेंकोव्ह यांनी केला. यातील एका कागदाचे तुकडे जोडल्यानंतर ही बाब समोर आल्याचे रशियन लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर आणखी एक आरोप केला होता. युक्रेनचे लष्कर व संशोधक चेर्नोबिल येथे डर्टी बॉम्ब बनविण्याच्या प्रयत्नात होते तसेच क्षेपणास्त्रांवर अणुस्फोटके लादण्याच्या तयारीत असल्याचा दावा रशियाने केला होता. युक्रेनने रशियाचे हे आरोप फेटाळले होते. पण जैविक शस्त्रांबाबत रशियन संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले पुरावे याहूनही अधिक गंभीर आहेत.

leave a reply