चीनमधील ‘विंटर ऑलिंपिक्स’वर बहिष्कार टाकण्याचा अमेरिकी सिनेटर्सचा प्रस्ताव

‘विंटर ऑलिंपिक्स’ वॉशिंग्टन/बीजिंग – चीनमधील ‘विंटर ऑलिंपिक्स’ १०० दिवसांवर असतानाच अमेरिकेने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले. चीनमध्ये आयोजित स्पर्धांवर राजनैतिक बहिष्कार टाकावा, असा प्रस्ताव अमेरिकेतील सिनेटर्सनी मांडला आहे. हा प्रस्ताव अमेरिकेच्या ‘डिफेन्स बिल’मध्ये दुरुस्तीच्या रुपात देण्यात आला असून त्यात उघूरवंशियांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर मिट रोम्नी व टॉड यंग आणि डेमोक्रॅट्स पक्षाचे टिम केन व एड मार्की यांनी हा चीनवरील बहिष्काराचा प्रस्ताव सादर केला आहे. ‘चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने उघूरवंशियांच्या वंशसंहारासह सर्व प्रकारच्या मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवावे’, अशी मागणी अमेरिकी संसद सदस्यांनी केली आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने आपल्या राजनैतिक अधिकारी व कर्मचार्‍यांना चीनमधील ‘विंटर ऑलिंपिक्स’ला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी पुरवू नये, अशी शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे.

अमेरिकेने राजनैतिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यास चीनच्या सत्ताधारी राजवटीला फटका बसेल, असा दावा सिनेटर्सनी केला आहे. उघूरवंशियांवरील अत्याचार तसेच हॉंगकॉंगच्या मुद्यावरून अमेरिकी संसद सदस्यांनी चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून नवा प्रस्तावही त्याचाच भाग आहे. हा प्रस्ताव ‘डिफेन्स बिल’मधील दुरुस्तीचा भाग म्हणून सादर करण्यात आल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकी संसदेने उघूरवंशियांवरील अत्याचाराच्या मुद्यावरून अनेक विधेयके मंजूर केली असून चिनी अधिकारी तसेच कंपन्यांवर निर्बंधही लादले आहेत.

‘विंटर ऑलिंपिक्स’गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय समुदायाने उघूरवंशियांच्या मुद्यावरून चीनला सातत्याने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ‘विंटर ऑलिंपिक्स’वरील बहिष्कारासंदर्भात सुरू असलेल्या हालचालीही त्याचाच भाग मानला जातो. आतापर्यंत अमेरिकेसह ब्रिटन, कॅनडा तसेच युरोपिय देशांमध्ये अशा प्रकारची बहिष्काराची मागणी करण्यात आली असून काही देशांच्या संसदेत ठरावही मांडण्यात आले आहेत. अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्या व संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी अमेरिकेने चीनमध्ये होणार्‍या विंटर ऑलिंपिक्सवर बहिष्कार टाकावा, यासाठी मोहीम छेडली होती. नाझी जर्मनीमध्ये ऑलिंपिकचे आयोजन केल्यानंतर हिटरलने दुसरे महायुद्ध छेडले होते. त्याच धर्तीवर विंटर ऑलिंपिकचे आयोजन यशस्वी झाल्यानंतर, चीन तैवानवर आक्रमण करील, असा इशारा हॅले यांनी दिला होता. आत्ताही चीन तैवानवर लष्करी कारवाईची धमकी देत असून ही बाब विंटर ऑलिंपिकच्या आयोजनाशी जोडलेली असू शकते, हा आरोप जबाबदार देशांना दुर्लक्षित करता येण्याजोगा नाही.

चीनने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून बहिष्काराची मागणी राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे आरोप केले आहेत.

leave a reply