कोरोनाव्हायरसचे संकट आलेले असले तरी इराण दीर्घकाळ बंद ठेवणे परवडणार नाही – इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी

तेहरान – कोरोनाव्हायरसच्या साथीने इराणमध्ये ४,३५७ जणांचा बळी घेतला आहे. या साथीचे ७० हजाराहून अधिक रुग्ण इराणमध्ये आहेत. पुढच्या काळात इराणमधील ही साथ अधिकच भयंकर स्वरूप धारण करील ,असे स्पष्टपणे दिसत असताना देखील इराणच्या सरकारने काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या साथीबरोबरच इराणला भयंकर आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे दीर्घकाळासाठी आर्थिक व्यवहार ठप्प ठेवून चालणार नाही, याची जाणीव इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी आपल्या जनतेला करून दिली.

गेल्या २४ तासात इराणमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीने १२५ जणांचा बळी घेतला आहे. तसेच या साथीचे १८३७ नवे रुग्ण दिवसभराच्या कालावधीत सापडले आहेत. ही साथ थैमान घालत असताना इराणमध्ये अराजक व अस्वस्थता माजू लागली असून गैरसमज व अफवा यांचाही जोरदार प्रसार सुरू झाला आहे. विशिष्ट प्रकारची दारू प्यायल्याने कोरोनाव्हायरस पासून स्वतःचा बचाव करता येतो, या गैरसमजुतीमुळे विषारी दारू पिऊन इराणमधील सहाशेहून अधिक जणांनी आपला जीव गमावला होता. कोरोनाव्हायरसच्या साथी इतक्याच भयंकर प्रमाणात इराणला आर्थिक समस्या देखील भेडसावत आहे. अणुकार्यक्रम बंद करण्यास नकार देणाऱ्या इराणवर अमेरिकेने कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे इराणची अर्थव्यवस्था प्रचंड दडपणाखाली आली असून कोरोनाव्हायरस सारख्या भयंकर साथीचा सामना करण्यासाठी इराणकडे पुरेशा प्रमाणात निधी नसल्याची ही बाब आता समोर आली आहे. अशा परिस्थितीत इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडे अर्थसहाय्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे इराणला मर्यादित प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरु करणे भाग पडत असल्याचे दिसत आहे . तसे स्पष्ट संकेत राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी दिले.

कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना देखील अमर्यादित काळासाठी इराणमधील अर्थव्यवहार थांबविता येणार नाहीत, असे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी म्हटले आहे . म्हणूनच सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून काही सरकारी कार्यालये व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जात असल्याची माहिती रोहानी यांनी दिली. मात्र त्यांच्या या निर्णयावर इराणच्या विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्राध्यक्ष रोहानी यांचे सरकार आर्थिक समस्यांचे कारण पुढे करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याची टीका इराणचे विरोधी पक्षनेते करू लागले आहेत.

कोरोनाव्हायरसची साथ झपाट्याने फैलावत असताना इराणच्या सरकारला घ्याव्या लागणाऱ्या या निर्णयामुळे हा देश आर्थिक पातळीवर असहाय्य बनल्याचे नव्याने समोर येत आहे. याचे फार मोठे राजकीय व सामाजिक परिणाम नजीकच्या काळात समोर येऊ शकतात. कोरोनाव्हायरसची साथ येण्यापूर्वी इराणमध्ये महागाई बेरोजगारीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली होती. ही निदर्शने रोखण्यासाठी इराणच्या यंत्रणांना कठोर कारवाई करावी लागली होती. त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसादही उमटले होते. आगामी काळातही इराणच्या सरकारला जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागू शकतो , अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

leave a reply