सार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचना

नवी दिल्ली – कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले. मात्र यानंतर बाजारांमध्ये आणि इतर ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे चित्र कित्येक ठिकाणी दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध शिथिल करताना काळजीपूर्वक सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्या. बाजारात गर्दी उसळणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत. त्याचवेळी एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी कोरोनाच्या साथीबाबतचे नियम पाळले गेले नाहीत, तर सहा ते आठ आठवड्यात तिसरी लाट येईल, असा इशारा दिला आहे.

सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी पाच पदरी धोरण स्वीकारायला हवे. कोरोनाचे संक्रमण पसरणार नाही यासाठी योग्य वर्तणुकीची व नियम पालनाची सर्वांकडून अपेक्षा आहे. ह्या बाबींकडे लक्ष पुरवा, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना सांगितले आहे. त्याचबरोबर चाचण्या, कोरोना रुग्णांचे ट्रॅकींग, उपचार या त्रिसूत्रिकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही भल्ला यांनी अधोरेखित केले. तसेच लसीकरण ही अतिशय महत्त्वाचे आहे, असे भल्ला म्हणाले.

सार्वजनिक ठिकाणी उसळलेल्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध शिथिल करताना दक्षता घेण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारांना सूचनामात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची साखळी पुर्णत: तुटणे अंत्यत आवश्यक ठरते. त्यामुळे जास्तीत जास्त जणांचे लसीकरण होईल याकडे लक्ष पुरवावे, असे केंद्रीय गृहसचिव भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांना सांगितले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यावर कित्येक राज्यांनी संचारनिर्बंध घातले होते व कोरोनाचे संक्रमण अधिक प्रमाणात पसरणार नाही याकडे लक्ष पुरविले. आता रुग्णांची संख्या कमी होत असताना विविध राज्यांनी नियम टप्प्याटप्प्यांनी शिथिल केले आहेत. यामुळे वर्दळ वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणे व या साथीची साखळी पुर्ण तुटणे आवश्यक आहे. यामुळे निर्बंध शिथिल करण्याच्या प्रक्रिया काळजीपूर्वक सर्व गोष्टींचा विचार करून करावी, असे केंद्रीय गृहसचिवांनी म्हटले आहे.

कोरोनाकाळात योग्य वर्तणुकीमध्ये मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोेशल डिस्टंन्सिंग यासारख्या बाबी आहेत, याकडे लक्ष वेधताना सध्या बाजारांमधून व इतर सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गर्दीवर, केंद्रीय गृहसचिव भल्ला यांनी बोट ठेवले आहे.

एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनीही नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन न झाल्यास व सरकारांनी या नियमांचे पालन करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा दिला आहे. नियमांचे पालन झाले नाही, तर सहा ते आठ आठवड्यात तिसरी लाट येईल, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. याआधी तीन निरनिराळ्या अहवालातही असाच इशारा देण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फार्सने चार आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती, तर तज्ज्ञांच्या हवाल्याने प्रसिद्ध एका अहवालात तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येईल, अशी चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण संख्येत आणखी घट झाली आहे. शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सुमारे ६० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आणि ६४७ जणांचा बळी गेला. देशातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेसची संख्या ७ लाख ६० हजारांपर्यंत खाली आली असून गेल्या ७४ दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्याचवेळी देशात शुक्रवारी १९ लाखाहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या. आतापर्यंत भारतात ३८ कोटी ९२ लाख चाचण्या झाल्या आहेत व पॉझिटिव्ह दर हा २.९८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

leave a reply