जम्मू-काश्मीरमध्ये बदलांना सुरुवात झाली आहे

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

श्रीनगर – कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये बदलास सुरुवात झाली असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. बुधवारी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास होत असलेल्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी हे वक्तव्य केले. त्यापूर्वी मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये दोन पोलीस व सरपंच जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jammu-Kashmirगेली ६० वर्ष जम्मू-काश्मीरला घटनेतील कलम ३७० अंतर्गत विशेष दर्जा होता. मात्र गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी हे कलम रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयास वर्ष पूर्ण झाले असून, या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरपंच गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुलवामामध्येही दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी ‘स्पेशल ऑपरेशन ग्रुप’च्या पोलिसांवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बदलाला सुरुवात झाली असून विकासकामांना गती देण्यात आली आहे. कायद्यांची अंमलबजावणी, सामाजिक न्याय, सबलीकरण आणि दुर्बल घटकांचे सशक्तीकरण करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर येथील दगडफेकीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीही सामान्य होत आहे.

मात्र पाकिस्तानला हे सहन होत नसल्याचे दिसत असून अशांतता निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहाय्य करण्यात येत आहे. परंतु सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात येत आहेत. यावर्षी सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत १५० दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

leave a reply