अफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा

नवी दिल्ली – पुढच्या काळात अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच चिघळू शकते. आत्ता विचारही करता येणार नाही, इतके अस्थैर्य व अराजक अफगाणिस्तानात माजेल, असा इशारा भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला. सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडींमुळे भिन्न संस्कृतींमधील संघर्ष पेटण्याची शक्यता संरक्षणदलप्रमुखांनी व्यक्त केली आहे. ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मधील कार्यक्रमात बोलताना संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी हे इशारे दिले आहेत.

अफगाणिस्तान, चीन व पाकिस्तानबाबत संरक्षणदलप्रमुख रावत यांचा इशारा‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या आपल्या पुस्तकात अमेरिकेचे विख्यात राजनितीज्ञ सॅम्युअल हंटिंग्टन यांनी संस्कृतीसंघर्षाचा सिद्धांत मांडला होता. पाश्‍चिमात्यांची उदार व लोकशाहीवादी संस्कृतीचा एकाधिकारशाही व संकुचित दृष्टीकोन असलेल्या संस्कृतीशी संघर्ष होईल, या हंटिंग्टंन यांनी मांडलेल्या निष्कर्षाची आठवण जनरल रावत यांनी करून दिली. पुढच्या काळात स्वार्थांध व वर्चस्ववादी सभ्यता असलेल्या देशाचे इस्लामी देशांबरोबरील सहकार्य संस्कृतींमधील संघर्षाला कारणीभूत ठरेल का? असा प्रश्‍न करून जनरल रावत यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला. चीनने इराण व तुर्की या देशांबरोबरील भक्कम सहकार्य प्रस्थापित केले आहे. आता चीन अफगाणिस्तानात वर्चस्व गाजविण्याची तयारी करीत आहे, असे सांगून या धोक्याकडे जनरल रावत यांनी लक्ष वेधले.

एकमेव महासत्तेकडून जगाचा प्रवास दोन महासत्तांच्या किंवा अनेक महासत्तांच्या दिशेने सुरू झाला आहे. देश अधिकाधिक आक्रमक बनू लागले आहेत. त्यातही आपली सत्ता प्रस्थापित करून जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडणारा चीन अधिकच आक्रमक बनला आहे. अशा जहाल आक्रमक बनलेल्या देशाशी भारताची सीमा भिडलेली आहे. हे लक्षात घेऊन भारताला आपली धोरणे आखावी लागणार आहेत. पाकिस्तान व चीन या शेजारी देशांपासून असलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताला आवश्यक ती पावले उचलावी लागणार आहेत, याची जाणीव जनरल रावत यांनी यावेळी करून दिली.

दरम्यान, पाकिस्तान दहशतवादाचा वापर करून भारताच्या विरोधात छुपे युद्ध छेडतच राहिल व याची व्याप्तीही वाढविल. जम्मू व काश्मीरमध्ये याचे दाखले मिळत आहेत. पुन्हा एकदा पंजाब अस्थीर करण्यासाठीही पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. ही कारस्थाने आखणारा पाकिस्तान चीनचा हस्तक म्हणून काम करीत आहे, असा आरोप यावेळी जनरल रावत यांनी केला आहे.

leave a reply