हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांनंतर चीन तैवानवर हल्ला चढवेल

तैवानवर हल्लावॉशिंग्टन – पुढील वर्षी होणार्‍या हिवाळी ऑलिंपिकनंतर चीनची राजवट तैवानवर हल्ला चढवेल, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणांमुळे चीनला अमेरिकेचा धाक राहिला नसून त्यामुळेच चीनची तैवानविरोधातील आक्रमकता वाढल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्यापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले तसेच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅक्मास्टर यांनीही चीन २०२२मध्ये तैवानवर हल्ला करेल, असे बजावले होते.

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या तैवानविरोधातील कारवायांची तीव्रता अधिकाधिक वाढताना दिसत आहे. तैवानच्या हद्दीत होणारी विमानांची घुसखोरी व तैवानजवळ होणारे युद्धसराव यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चीनच्या युद्धनौका व पाणबुड्या सातत्याने तैवाननजकिच्या सागरी हद्दीत वावरताना दिसत आहेत. तैवानवरील संभाव्य आक्रमणासाठी चीनने देशाच्या इतर भागांमधील लष्करी तुकड्या तसेच रणगाडे व लष्करी वाहने दक्षिण भागात तैनात करण्यास सुरुवात केल्याचेही वृत्त आले होते. चीनचे नेते तसेच ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून तैवानला सातत्याने धमकावण्यात येत आहे.

तैवानवर हल्लाया पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो. ‘चीन सध्या तैवानविरोधात ज्या आक्रमकतेने कारवाया करतो आहे, त्या माझ्या कार्यकाळात होत नव्हत्या. माझ्या कारकिर्दीत चीनने तैवानच्या हद्दीत बॉम्बर्स विमाने धाडली नव्हती. अशी गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, याची चीनला जाणीव होती. चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर आपले संबंध चांगले होते’, असा दावा माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला.

तैवानवर हल्ला‘माझ्या काळात चीन तैवानविरोधात इतका आक्रमक नव्हता. मात्र आता ते ऑलिंपिक स्पर्धा संपेपर्यंत वाट पाहतील आणि त्यानंतर तैवानवर हल्ला करतील’, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. चीनच्या या आक्रमकतेला राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची धोरणे कारणीभूत असल्याची टीकाही त्यांनी केली. अफगाणिस्तानात काय झाले ते चीनने पाहिले असून चीनला आता अमेरिकेबद्दल आदर राहिलेला नाही, याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले. चीनपाठोपाठ रशिया व उत्तर कोरियादेखील पावले उचलू शकतात, असेही माजी राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

ट्रम्प यांच्यापूर्वी निक्की हॅले व मॅक्मास्टर यासारख्या माजी वरिष्ठ अधिकार्‍यांनी चीन तैवानवर २०२२मध्येच हल्ला करेल, असे संकेत दिले होते. ‘चीनमध्ये होणारे विंटर ऑलिंपिक व्यवस्थितपणे पार पडले, तर त्याचा वापर चीन आपण महासत्ता बनलो आहोत, हे दाखविण्यासाठी करील. यात यश मिळाले की चीन तैवानचा घास गिळल्यावाचून राहणार नाही’, असा इशारा हॅले यांनी दिला होता. चीन हल्ला चढवून तैवानचा ताबा घेईल आणि अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देश चीनचे काहीही वाकडे करू शकणार नाही, असे ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रूड यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते.

leave a reply