फ्लॉईड प्रकरणी चीनच्या टीकेने कम्युनिस्ट राजवटीचा खरा चेहरा दाखविला – अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचा चीनला टोला

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने संवेदनाशून्य पद्धतीने त्याचा गैरफायदा उचलण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यातून या राजवटीचा खरा चेहरा पुन्हा दिसून आला आहे’, असा सणसणीत टोला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी लगावला. फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरू झालेल्या निदर्शनांचा पार्श्वभूमीवर चीनने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघटनेत उपस्थित केला होता. त्याचवेळी अमेरिकेतील आंदोलनाचे विपर्यस्त चित्रण असणारे काही व्हिडीओही चीनकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, अमेरिकेत सलग १३ दिवस सुरू असणाऱ्या निदर्शनांचं लोण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरण्यास सुरुवात झाली असून शनिवारी युरोप, आशिया तसेच ऑस्ट्रेलियातही मोठ्या प्रमाणात निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या महिन्यात २५ मे रोजी, अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एका पोलिसी कारवाईत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजात संतापाची लाट उसळली असून पोलिसी अत्याचारांच्या निषेधार्थ व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. फ्लॉईड यांच्या मृत्यूचे निमित्त पुढे करून देशभरात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून त्याचा फायदा अमेरिकवतील काही राजकीय गटांसह अमेरिकेचे प्रतिस्पर्धी देशही घेताना दिसत आहेत. कोरोना व हॉंगकॉंगवरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष्य ठरलेल्या चीनने आपल्या बचावासाठी अमेरिकेवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली होती. अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यानी त्याला खणखणीत प्रत्युत्तर दिल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते.

‘चीनमध्ये हॉंगकॉंगपासून ते तिआनमिनपर्यंत सत्ताधारी राजवटीविरोधात आवाज उठवणाऱ्या निदर्शकांना सशस्त्र पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण केली जाते. अशा कारवाईची माहिती देणाऱ्या पत्रकारांना तुरुंगात धाडले जाते. मात्र अमेरिकेत निदर्शनांचे स्वागत केले जाते. गैरवर्तन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली जाते आणि लूट व जाळपोळ करणाऱ्यांना कठोर दंड केला जातो. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांशी बांधील राहून नागरिकांचे स्वातंत्र्य व सुरक्षेची काळजी घेतली जाते. अमेरिकेतील माध्यमे देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व घटनांची दखल घेतात व ती जगासमोर दाखवितात’, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी अमेरिका व चीनमध्ये असलेल्या फरकाची जाणीव करून दिली.

हुकूमशाही राजवटीमध्ये पक्षाची सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊन असत्याचा हवा तसा वापर केला जातो, अशा शब्दात पॉम्पिओ यांनी, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला फटकारले. अमेरिकेतील घटनांच्या पार्श्वभूमीवर चीनकडून करण्यात येणारा प्रचार हास्यास्पद असून त्याला कोणीही बळी पडणार नाही, असेही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी बजावले. यावेळी पॉम्पिओ यांनी कोरोना साथीच्या मुद्यावरही चीनला लक्ष्य केले आणि ही राजवट डॉक्टर व पत्रकारांना गायब करून खोट्या माहितीच्या आधारे जगाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला.

दरम्यान, अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्युनंतर सुरू झालेली निदर्शने सलग तेराव्या दिवशीही कायम आहेत. शनिवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह देशातील अनेक शहरात पुन्हा एकदा लाखो निदर्शक फ्लॉईड यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू असतानाही निदर्शकांनी ती मोडून कृष्णवर्णीय नागरिकांवर होणारे अत्याचार आणि पोलिसी बळाचा वापर याविरोधात आपला असंतोष व्यक्त केला. शनिवारी झालेल्या निदर्शनांमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटनेची नोंद झाली नसली, तरी काही ठिकाणी आक्रमक निदर्शक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेत सुरू झालेल्या निदर्शनांचे लोण जगातील इतर प्रमुख देशांमध्येही पसरल्याचे शनिवारी दिसून आले. युरोपमधील ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियमसह अनेक देशांमध्ये अमेरिकेतील आंदोलनाला समर्थन देणाऱ्या मोर्च्यांचेआयोजन करण्यात आले होते. आशिया खंडातील जपान तसेच दक्षिण कोरियामध्येही निदर्शने झाली. ऑस्ट्रेलिया तसेच दक्षिण आफ्रिकेत मोठी निदर्शने झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

leave a reply