चीन अमेरिकेवर ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स’चा हल्ला चढवू शकतो

- टास्क फोर्स व तज्ज्ञांचा इशारा

‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स’चा हल्लावॉशिंग्टन/बीजिंग – चीन ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स वेपन’चा (इएमपी) वापर करून अमेरिकेवर हल्ला चढवू शकतो, असा इशारा टास्क फोर्सचे संचालक पीटर प्राय यांनी दिला आहे. ‘इएमपी वेपन’च्या हल्ल्यामुळे चीन एका फटक्यात अमेरिकेविरोधातील युद्ध जिंकू शकतो, असेही प्राय यांनी बजावले. ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स वेपन’चा हल्ला रक्तहीन वाटत असला तरी त्याचे परिणाम दीर्घकाळ कायम राहिल्यास अमेरिकेतील ९० टक्के लोकसंख्येचा बळी जाऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञ प्लामेन डोयनोव्ह यांनी व्यक्त केली आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी चीन आकस्मिक अणुहल्ला चढवू शकतो, याकडे लक्ष वेधले होते.

गेल्या वर्षभरात अमेरिका व चीनमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला असून चीनची राजवट सातत्याने आपल्या वाढत्या संरक्षणसामर्थ्याचे प्रदर्शन करीत आहे. तैवानच्या मुद्यावरून अमेरिका व चीनमध्ये युद्ध भडकण्याची चिंता व्यक्त होत असून, चीनची संरक्षणदले तैवानसह अमेरिकेलाही धडा शिकवतील, असा आक्रमक सूर चीनने लावून धरला आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीनंतर अमेरिकेतही चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या ‘इएमपी वेपन’बाबत समोर आलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स’चा हल्लाअमेरिकेच्या नॅशनल ऍण्ड होमलॅण्ड सिक्युरिटी विभागाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक हल्ल्याच्या धोका लक्षात घेऊन स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली होती. त्याचे प्रमुख पीटर व्हिंसेट प्राय यांनी चीनच्या ‘इएमपी वेपन’ हल्ल्यावरून गंभीर इशारा दिला आहे. ‘चीनसह इतर शत्रूदेश अमेरिकेविरोधात इलेक्ट्रोमॅग्नेटिक शस्त्राचा वापर करु शकतात. अशा हल्ल्याने एका फटक्यात युद्धाचे पारडे उलट फिरण्याचा धोका आहे’, असे प्राय यांनी बजावले. चीनसारखे देश ‘इएमपी वेपन’बरोबरच सायबरहल्ले व घातपाताचा वापर करून हल्ल्याची तीव्रता अधिक वाढवू शकतात, याकडेही टास्क फोर्सच्या प्रमुखांनी लक्ष वेधले.

‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स’चा हल्ला‘इएमपी वेपन’चा हल्ला सुरुवातील रक्तहीन वाटत असला तरी दीर्घकाळासाठी अमेरिकेतील वीजपुरवठा कोलमडून ‘ब्लॅकआऊट’चा फटका बसल्यास ९० टक्के लोकसंख्येचा बळी जाऊ शकतो, अशी भीती प्लामेन डोयनोव्ह यांनी व्यक्त केली. डोयनोव्ह हे ‘इएमपी शिल्ड’ या कंपनीत तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. प्रगत लष्करी तंत्रज्ञान नसणारे देशही इलेक्ट्रोमॅग्नेटिक शस्त्राचा वापर करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही चीनकडून असलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक हल्ल्याच्या धोक्याचा उल्लेख करण्यात आला होता. चीनने अशा प्रकारच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ युद्धाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करील, असेही बजावण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात चीनमधील ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने चीनच्या संरक्षणदलाकडून ‘ंइएमपी वेपन’ची चाचणी करण्यात आल्याचे वृत्त दिले होते. त्यात चीन ८० गिगावॅटच्या ‘इएमपी वेपन’वर संशोधन करीत असल्याचा दावाही करण्यात आला होता.

leave a reply