चीनने तैवान व जपानच्या सागरी क्षेत्रात क्षेपणास्त्रे डागली

Chinese-missileतैपेई/टोकिओ – तैवानचे आखात आणि त्यानंतर जपानच्या सागरी क्षेत्रात क्षेपणास्त्रे डागून चीनने जगभरात खळबळ माजविली. अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीचा निषेध नोंदविण्यासाठी चीनने ही प्रक्षोभक कारवाई केली आहे. तैवान व जपानने याची गंभीर दखल घेतली आहे. क्षेपणास्त्रे डागण्याबरोबरच आपल्या सागरी व हवाई क्षेत्राजवळ चीन करीत असलेल्या युद्धसरावांना प्रत्युत्तर देणारे सराव तैवानने आयोजित केले आहेत. तसेच तैवानने आपली हवाई सुरक्षा यंत्रणा देखील कार्यान्वित केली आहे. चीन कुठल्याही क्षणी इथला तणाव चिघळविणारे निर्णय घेईल आणि त्यानंतर परिस्थिती कुणाच्याही नियंत्रणात राहणार नाही, असा इशारा अमेरिकास्थित चिनी वंशाच्या विश्लेषकाने दिला आहे.

तैवानला भेट दिल्यानंतर नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेल्या. तिथून त्या जपानमध्ये दाखल होण्याच्या आधी चीनने तैवानच्या आखातात सुमारे ११ क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये युद्धनौकांना जलसमाधी देण्याची क्षमता असलेल्या डाँगफेंग क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. यातील काही क्षेपणास्त्रांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याचे समोर आले आहे. चीनने प्रक्षेपित केलेली ही क्षेपणास्त्रे सागरी क्षेत्रातच कोसळली व त्याने कुठल्याही स्वरुपाची हानी झालेली नसली, तरी याद्वारे चीनने सदर क्षेत्रातील वातावरण स्फोटक बनविले आहे. याआधीच चीनने तैवानच्या क्षेत्राजवळ सुमारे सहा ठिकाणी युद्धसराव सुरू केले आहे. लाईव्ह फायर अर्थात युद्धात वापरला जाणारा दारूगोळा वापरून चीनचे लष्कर करीत असलेल्या या युद्धसरावांद्वारे चीन आपली कोंडी करू पाहत असल्याचा आरोप तैवानने केला आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल तैवाननेही युद्धसरावांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबरच तैवानने आपली हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून आपण चीनच्या संभाव्य हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी सुसज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

Nancy-Pelosiजपानच्या हद्दीत येणाऱ्या ‘एक्सक्ल्यूझिव्ह इकॉनॉमिक झोन-ईईझेड’ अर्थात विशेष सागरी क्षेत्रात पाच क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करून चीनने जपानलाही इशारा दिला. चीनने या क्षेत्रात नऊ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली होती, यापैकी पाच क्षेपणास्त्रे जपानच्या ‘ईईझेड’मध्ये कोसळल्याची माहिती जपानचे संरक्षणमंत्री नबुआ किशी यांनी दिली. चीनने तैवानवर आक्रमण केलेच, तर जपान या युद्धात तैवानच्या बाजूने उडी घेईल, असे जपानच्या नेत्यांनी याआधीच जाहीर केले होते. तसेच नॅन्सी पेलोसी जपानच्या भेटीवर येण्याआधीच चीनने ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करून जपानला धमकावल्याचे दिसत आहे. याबरोबरच चीनने कंबोडियातील असियान देशांच्या बैठकीदरम्यान होणारी चीन व जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा देखील रद्द केली आहे.

चीनच्या या प्रक्षोभक कारवायांमागे, या देशातील अंतर्गत राजकारणाचा फार मोठा वाटा असल्याचा दावा जगभरातील विश्लेषक करीत आहेत. आधीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या समस्या व ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे दबावाखाली आले आहेत. चीनवर एकाधिकारशाही असलेल्या कम्युनिस्ट पक्षातूनच त्यांना आव्हान मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. अशा परिस्थितीत आपल्या कारकिर्दीची तिसरी टर्म जवळ येत असताना, या आव्हानांवर मात करणे जिनपिंग यांच्यासाठी अवघड बनत चालले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या पेलोसी यांनी तैवानला भेट देऊन चीनला चिथावणी दिली, पण राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अमेरिका व तैवानच्या विरोधात फारसे काही करू शकले नाहीत, अशी टीका चीनमधून होत आहे. चीनच्या सोशल मीडियावर याचे पडसाद उमटू लागले आहेत.

अंतर्गत राजकारणातील हा दबाव लक्षात घेता अमेरिका व तैवानच्या विरोधात आक्रमक पावले उचलणे ही चीनच्या राष्ट्राध्यक्षांची गरज बनली आहे. त्याखेरीज ते आपली प्रतिमा उंचावू शकत नाहीत, याकडे काही विश्लेषक लक्ष वेधत आहेत. अमेरिकेतील चिनी वंशाचे विश्लेषक गॉर्डन चँग यांनी ही बाब अधोरेखित करून चीन तैवानचा अधिकार असलेली छोटी बेटे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करील, असा इशारा दिला आहे. चीनच्या या कारवायांचे जबरदस्त पडसाद उमटतील आणि त्यानंतर कुणाचेही नियंत्रण उरणार नाही, अशा भयंकर घटनांची मालिकाच सुरू होईल, असा इशारा गॉर्डन चँग यांनी दिला आहे.

leave a reply