चीनने जपानजवळील सागरी क्षेत्रात विमानवाहू युद्धनौका, विनाशिका रवाना केल्या

- जपान, तैवानचे लष्कर अलर्टवर

विमानवाहू युद्धनौकाटोकिओ – चीनची ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौका आणि आठ विनाशिकांनी जपानच्या ओकिनावा बेटाजवळून प्रवास केला. याद्वारे चीनने आपले सामर्थ्यप्रदर्शन केल्याचा दावा केला जातो. तर चीनच्या युद्धनौकांची ही गस्त जपानसह तैवानसाठी इशारा असल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, जपानने आपली युद्धनौका आणि बॉम्बर विमाने रवाना करून चिनी युद्धनौकांच्या या गस्तीला इशारा दिला. तर तैवानने देखील आपल्या संरक्षणदलांना अलर्टवर राहण्याची सूचना केली आहे.

चीनने पश्चिम पॅसिफिक क्षेत्रात ‘रिअलीस्टिक कॉम्बॅट ड्रिल’ अर्थात वास्तववादी युद्धसराव सुरू केला आहे. यासाठी चीनने आपल्या युद्धनौकांचा ताफा पश्चिम पॅसिफिक क्षेत्रासाठी रवाना केल्या आहेत. आपला हा युद्धसराव कुठल्याही देशाविरोधात नसल्याचे चीनच्या नौदलाने जाहीर केले आहे. पण यासाठी चीनच्या युद्धनौकांनी जपानच्या ओकिनावा बेटाजवळून केलेला प्रवास चिथावणी देणारा ठरला आहे. आधीच सावध असलेल्या जपानने चिनी विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांच्या मागे आपली ‘उझूमो’ ही हेलिकॉप्टरवाहू युद्धनौका तसेच ‘पी-1′ टेहळणी विमान आणि ‘पी-3सी’ पाणबुडीभेदी विमान रवाना केले.

चार महिन्यांपूर्वी याच क्षेत्रातून चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने गस्त घातली होती. त्यानंतर सोमवारी लिओनिंगने सात विनाशिकांसह येथून प्रवास केला, हा योगायोग नाही, याकडे स्थानिक माध्यमे लक्ष वेधत आहेत. यावेळी चीनच्या युद्धनौका जपानच्या ओकिनावा बेटापासून 480 किलोमीटर अंतरावरुन प्रवास करीत होत्या. चीनने योजनाबद्धरित्या हा प्रवास घडवून आणला व त्याद्वारे जपान, अमेरिका व तैवानला इशारा दिल्याचे आरोप होत आहेत.

जपानच्या ओकिनावा बेटावर अमेरिकेचा हवाईतळ आहे. इथे अमेरिकेची प्रगत लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स तैनात आहेत. याआधीही चीनने ओकिनावा बेटांच्या हद्दीजवळून आपल्या विनाशिका रवाना केल्या होत्या. यावर जपान तसेच अमेरिकेने आक्षेप नोंदविला होता. पण आता अमेरिकेचे लक्ष युक्रेनच्या युद्धाकडे लागलेले असताना, चीनच्या युद्धनौकांचा या क्षेत्रातील प्रवास केवळ इशारा देण्यासाठी नाही, असे संकेत मिळत आहेत.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या धर्तीवर चीन देखील तैवानवर हल्ला चढविल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र आणि लष्करी विश्लेषक देखील तैवानचा ताबा घेण्याची संधी चालून आल्याचे सांगत आहेत. तैवानच्या दिशेने रोखलेल्या क्षेपणास्त्रांच्या संख्येत भर घालून चीनने आपण ही संधी साधण्याच्या तयारीत असल्याचे दाखवून दिले आहे. चीनची लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत वारंवार घुसखोरी करून तैवानच्या युद्धसज्जतेचा अंदाज घेत आहेत.

अशा परिस्थितीत, लिओनिंग विमानवाहू युद्धनौकेने आपल्या ताफ्यासह जपानच्या ओकिनावा बेटाजवळून घातलेली गस्त देखील चीनच्या याच युद्धसज्जतेचा भाग असल्याचे दिसतेे. तैवानवर हल्ला चढविल्यानंतर, अमेरिका चीनवर आर्थिक निर्बंध लादू शकेल. त्यामुळे चीनची परदेशातील मालमत्ता धोक्यात येईल. या मालमत्तेचे रक्षण कशारितीने करता येईल, याची चाचपणी करण्यासाठी चीनने देशी व परदेशी बँकांची बैठक बोलवल्याचे उघड झाले आहे. यामुळे जपान-तैवानच्या विरोधातील चीनच्या कारवाया म्हणजे केवळ इशारे व धमक्या देण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्यामागे तैवानवरील हल्ल्याची व्यूहरचना असल्याचे दिसू लागले आहे.

तैवानवरील चीनचा हल्ला म्हणजे जपानवरील हल्ला मानला जाईल, असे जपानने जाहीर केले होते. तसेच जपानने तैवानला आवश्यक ते सहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत जपान आपल्यापासून सुरक्षित राहू शकत नाही, असा संदेश चीन जपानला देत आहे. पण आपल्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास करणाऱ्या चीनच्या नौदलामागे आपल्या युद्धनौका धाडून जपानने आपण चीनच्या सामर्थ्याच्या धाकात राहणार नाही, हे दाखवून दिले आहे.

leave a reply