क्वाडची बैठक सुरू असतानाच चीनच्या लढाऊ विमानांनी चिथावणीखोर कारवाई केल्याचा जपानचा आरोप

चिथावणीखोर कारवाईटोकिओ – चीनच्या विरोधात उभी राहत असलेली क्वाड संघटना कधीही यशस्वी ठरू शकणार नाही. क्वाडचे अपयश निश्चित असल्याचा दावा चीनने केला होता. मात्र जपानच्या टोकिओमध्ये क्वाड देशांचे प्रमुख चर्चा करीत असतानाच, चीनने जपानच्या हवाई हद्दीजवळून आपली लढाऊ विमाने पाठवून क्वाडला इशारा दिल्याचे उघडझाले आहे. जपानने याची गंभीर दखल घेऊन चीनच्या या चिथावणीखोर कारवाईचा जळजळीत शब्दात निषेध नोंदविला. चीनसोबत रशियन बॉम्बर्स विमाने देखील होती, असा ठपका जपानचे संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांनी ठेवला आहे.

याआधीच्या चिथावणीखोर कारवायांपेक्षाही यावेळी चीनने दिलेली ही चिथावणी अतिशय गंभीर होती. क्वाडची बैठक सुरू असताना, चीन व रशियाने केलेली ही कारवाई अतिशय संवेदनशील बाब ठरते, असे जपानचे संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांनी म्हटलेआहे. केवळ जपानच नाही तर दक्षिण कोरियाने देखील चीन व रशियाची लढाऊ विमाने आपल्या हवाई हद्दीजवळ पोहोचली होती, अशी माहिती दिली. मात्र आपल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी त्वरित हालचाली करून चीन व रशियाच्या विमानांना पिटाळून लावल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजता व त्यानंतर साडेनऊ वाजता हा प्रकार घडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले होते.

चिथावणीखोर कारवाईपुढे 3.40 मिनिटांनीही अशाच प्रकारचे हवाई घुसखोरीचे प्रयत्न झाले होते, असे सांगून दक्षिण कोरियाने यावर चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण कोरियाने युक्रेनच्या युद्धाबाबत अमेरिका व पाश्चिमात्य देशांबरोबरील सहकार्य वाढविले आहे. त्यामुळे रशिया व चीनकडून दक्षिण कोरियावर दडपण वाढविले जात असल्याचे या देशातील माध्यमांचे म्हणणे आहे. दरम्यान, भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाड संघटनेला चीनविरोधात अजिबात यश मिळणार नाही, असे दावे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी नुकतेच केले होते. मात्र चीन क्वाडकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याची बाब चीनच्या लढाऊ विमानांनी जपानच्या हवाई हद्दीजवळून केलेल्या प्रवासातून उघडझाले आहे.

या हालचालींद्वारे चीन क्वाडच्या सदस्यदेशांना आपल्या आक्रमक प्रतिसादाचा इशारा देऊ पाहत आहे. विशेषतः क्वाडची लष्करी आघाडी आपल्या वर्चस्वाला आव्हान देऊन मोडीत काढील, अशी चिंता चीनला सतावत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या या कारवाईची गंभीर दखल घेतली असून पुढच्या काळात चीनला या कारवाईचे परिणाम सहन करावे लागतील, असे संकेत मिळत आहेत.

जपानने केलेल्या या दाव्यांवर अद्याप भारताने प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. यावर भारताने बोलणे उचित ठरणार नाही, असे भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

leave a reply