चीन-रशियाचा आखातातील प्रभाव म्हणजे अमेरिकेसमोरील मोठे आव्हान

अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांचा इशारा

वॉशिंग्टन – इंधनाच्या उत्पादनावरून अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये झालेले मतभेद ही गंभीर बाब ठरते. सौदी व इतर आखाती देश अमेरिकेपासून दूर चालले असून या देशांची चीन व रशियाबरोबरील जवळीक वाढत आहे. अमेरिका एकाकी पडत चालली असून हे आपल्या देशासमोरील फार मोठे आव्हान ठरते, असा इशारा अमेरिकेचे माजी अर्थमंत्री लॅरी समर्स यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत समर्स यांनी अमेरिकेचा आखाती क्षेत्रासह जगभरातील प्रभाव ओसरत असल्याची चिंता व्यक्त केली.

summers-jobs-reportसौदी अरेबिया व इराणमध्ये मध्यस्थी करून चीनने या देशांमध्ये वाटाघाटी सुरू केल्या आहेत. यामुळे आखाती क्षेत्रातील चीनचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दावे केले जातात. त्याचवेळी इंधन उत्पादक संघटना व रशिया यांचा सहभाग असलेल्या ‘ओपेक प्लस’ने अमेरिकेच्या मागणीनुसार इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे नाकारून उलट इंधनाच्या उत्पादनात कपात करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे इंधनाचे दर अधिकच वाढतील आणि इतर देशांबरोबरच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसणार आहे.

या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबिया व इतर आखाती देशांवरील अमेरिकेचा प्रभाव ओसरत असल्याची चर्चा सुरू झाली. अमेरिकन मुत्सद्दी व विश्लेषक याला बायडेन प्रशासनाची बेजबाबदार धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप करीत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी अर्थमंत्री लॅरी समर्स यांनी आपल्या देशाचा जगभरावरील प्र्रभाव कमी होत चालल्याची चिंता व्यक्त करून अमेरिकेसमोर फार मोठे आव्हान खडे ठाकले आहे, याची जाणीव करून दिली.

सौदी अरेबिया व इतर आखाती देश चीन व रशियाच्या जवळ चालले आहेत, ही चिंताजनक बाब ठरते. अमेरिका आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडू लागल्याचे यामुळे दिसू लागले असून पुढच्या काळात याचे परिणाम समोर येतील, असा इशारा समर्स यांनी दिला आहे. विशेषतः अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरित प्रभाव पडेल, याकडेही लॅरी समर्स यांनी लक्ष वेधले.

ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, त्यांनी अमेरिकेच्या निकटतम सहकारी देशांच्या विरोधात जाणारी धोरणे स्वीकारली होती. याचा फटका अमेरिकेला बसला असून एकेकाळी अमेरिकेवर पूर्णपणे विसंबून असलेले आखाती देश आता अमेरिकेकडे पाठ फिरवित असल्याचे दिसू लागले आहे. चीन व रशिया यांचा आखाती क्षेत्रातील वर्चस्व वाढत चालले असल्याचे इशारे अमेरिकन मुत्सद्यांकडून सातत्याने मिळत असताना देखील बायडेन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

leave a reply