बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांचा फायदा घेऊन चीनने सौदीबरोबर 30 अब्ज डॉलर्सचे करार केले

चुकीच्या धोरणांचा फायदारियाध – गेल्या दीड वर्षामध्ये अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने सौदी अरेबिया आणि आखाती मित्रदेशांबाबत स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांचा फायदा चीन घेत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सौदीचा दौरा करून या देशाबरोबर तब्बल 30 अब्ज डॉलर्सचे सहकार्य करार केले आहेत. मानवाधिकार आणि इंधनाचे उत्पादन यावरुन अमेरिका व सौदीतील संबंध ताणलेले असताना चीनने हा करार केल्याचे आंतरराष्ट्रीय निरिक्षक लक्षात आणून देत आहेत. सौदीच्या दौऱ्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग इतर आखाती देशांचा दौरा करू शकतात.

गेल्या कित्येक दशकांपासून सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांबरोबर अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून आखाती देशांबरोबरील अमेरिकेच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. अणुकरारासाठी इराणशी सुरू केलेल्या वाटाघाटी, सौदी-युएईवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे केलेले आरोप यासाठी कारणीभूत ठरले होते.

बायडेन प्रशासनाने आपली भूमिका बदलली नाही तर अमेरिका आखातातील आपले मित्रदेश गमावून बसेल व या परिस्थितीचा फायदा घेऊन चीन आखातात आपले पाय रोवेल, असा इशारा अमेरिकन सिनेटर्स व विश्लेषकांनी दिला होता. अशा परिस्थितीत, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा तीन दिवसांच्या सौदी दौऱ्यावर दाखल झाले आहेत. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतल्यानंतर चीनने सौदीबरोबर 30 अब्ज डॉलर्सचे 34 करार केले.

यामध्ये हरित ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था, बांधकाम क्षेत्रासंबंधी करारांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या ‘व्हिजन 2030’ आणि जिनपिंग यांच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’वरील चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

शुक्रवारपासून रियाध येथे ‘चायनीज-अरब समिट’ आयोजित होणार आहे. यामध्ये आखातातील इतर इंधनसंपन्न देश देखील सहभागी होतील. त्यामुळे जिनपिंग यांच्या या सौदी दौऱ्याला मिळत असलेले यश बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांचे फलित असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे व विश्लेषक करीत आहेत.

हिंदी

leave a reply