चीनने रशियाला सहाय्य पुरवू नये

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

CHINA-FRANCE-DIPLOMACYबीजिंग – युक्रेनवर हल्ला करणाऱ्या आक्रमक रशियाला चीनने अधिक सहाय्य पुरवू नये, असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिला. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन बुधवारी चीनच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यात चीनबरोबरील आर्थिक सहकार्य वाढविणे व रशिया-युक्रेन शांतीचर्चेसंदर्भात बोलणी करणे यावर भर दिला जाईल, असे संकेत फ्रेंच सूत्रांनी दिले आहेत. गुरुवारी इराण व सौदी अरेबियाचे वरिष्ठ मंत्री चीनमध्ये दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची चीनमधील उपस्थिती लक्ष वेधणारी ठरते.

काही दिवसांपूर्वी स्पेनच्या पंतप्रधानांनी चीनला भेट दिली होती. त्यापाठोपाठ आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन तसेच युरोपिय महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन देर लेयेन चीनमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षात युरोप व चीनमधील संबंध अधिकाधिक चिघळत असतानाच युरोपिय नेत्यांचे हे वाढते दौरे आश्चर्यजनक ठरतात. युरोपिय महासंघाने आपल्या परराष्ट्र धोरणात चीनचा उल्लेख प्रतिस्पर्धी असा केला आहे. मात्र त्याचवेळी सध्याच्या काळात आर्थिक व व्यापारी पातळीवर चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडता येणार नाहीत, अशी कबुलीही दिली आहे.

युक्रेन संघर्षात चीनने रशियाला दिलेले समर्थन युरोपिय देशांसमोरील अडचणी अधिकच वाढविणारे ठरले आहे. रशियाला समर्थन देणाऱ्या इतर देशांवर युरोपिय महासंघाकडून दबाव व दडपणाचा वापर करण्यात येत आहे. मात्र चीनसारख्या देशावर याचा वापर करता येणार नाही, याची महासंघाला कल्पना आहे. त्यामुळेच चीनबरोबरील तणावपूर्ण संबंध कायम राखण्यासाठी युरोपची धडपड सुरू असून मॅक्रॉन व लेयेन यांचा दौरा त्याचाच भाग ठरतो.

leave a reply