चीनच्या ‘साऊथ चायना सी’मधील कारवायांविरोधात जपान व कंबोडियाचे एकमत

नॉम पेन्ह/टोकिओ – चीनकडून साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरू असणार्‍या आक्रमक कारवायांविरोधातील सहकार्यावर जपान व कंबोडियात एकमत झाले आहे. यावेळी ‘आसियन’ व पाच आघाडीच्या देशांमध्ये झालेल्या ‘आरसीईपी’ या व्यापारी कराराच्या अंमलबजावणीच्या मुद्यावरही चर्चा झाल्याची माहिती दोन्ही देशांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात चीनने कंबोडियाबरोबरील लष्करी व व्यापारी सहकार्य वाढविले असून या देशात संरक्षणतळ उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी कंबोडियाला दिलेली भेट व चीनच्या कारवायांविरोधात झालेले एकमत लक्षवेधी घटना ठरते.

चीनच्या ‘साऊथ चायना सी’ व नजिकच्या सागरी क्षेत्रातील विस्तारवादी कारवायांवर ‘आसियन’ देशांकडून तीव्र प्रत्युत्तर मिळण्यास सुरुवात झाली आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर यासारख्या प्रमुख देशांनी चीनचे दडपण झुगारून स्वतंत्र धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने कंबोडिया, लाओस, म्यानमार यासारख्या देशांशी जवळीक साधत ‘आसियन’वर दबाव टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या दशकात चीन व कंबोडियामध्ये गोपनीय संरक्षण करार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या करारानुसार, कंबोडियाने चीनला आपल्या नौदल तळाचा वापर संरक्षणतळ म्हणून करण्याची परवानगी दिली आहे. त्याबदल्यात चीन कंबोडियाला संरक्षणयंत्रणा पुरविणार असून पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूकही करणार आहे. यामुळे अमेरिका व मित्रदेश अस्वस्थ असून कंबोडियावर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकारी वेंडी शेरमन यांनी गेल्या वर्षी कंबोडियाला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी चीनच्या हालचालींबाबत सवाल केले होते. त्यानंतर आता जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी कंबोडियाला भेट देऊन चीनच्या हालचालींबाबत बजावल्याचे सांगण्यात येते. जपानी पंतप्रधानांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कंबोडियाने चीनच्या मुद्यावर जपानला आश्‍वस्त केल्याचा दावा जपानच्या माध्यमांनी केला. चीनबरोबरच म्यानमार-आसियन चर्चेवरूनही जपानने कंबोडियाला खडसावल्याचे सांगण्यात येते. जपानने कंबोडियाला मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य तसेच कोरोना लसींची भेट देत असल्याचेही जाहीर केले आहे.

leave a reply