चीनचे ‘स्पेस रॉकेट’ पृथ्वीवर कोसळण्याचा इशारा

- ‘पेंटॅगॉन’कडून टेहळणी सुरू

वॉशिंग्टन – चीनने गेल्या महिन्यात अंतराळातील प्रक्षेपणासाठी वापरलेले तब्बल २१ टन वजनाचे रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता असल्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चिनी रॉकेटची टेहळणी सुरू केली असून त्यासंदर्भातील माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट केले. अंतराळात धाडण्यात आलेले चिनी रॉकेट अथवा यान पृथ्वीवर कोसळण्याची गेल्या तीन वर्षातील ही दुसरी मोठी घटना ठरु शकते. २०१८ साली चीनचे ‘तिआनगॉंग-१’ हे अंतराळस्थानक पॅसिफिक महासागरात कोसळले होते.

गेल्या आठवड्यात २९ एप्रिलला चीनने ‘लॉंग मार्च ५बी’ या प्रक्षेपक रॉकेटच्या सहाय्याने ‘तिआनहे’ यान अंतराळात प्रक्षेपित केले होते. ‘तिआनहे’ यान चीनच्या अंतराळस्थानकाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. हे यान पृथ्वीच्या ‘लो ऑर्बिट’मध्ये पाठविताना चीनच्या प्रक्षेपक रॉकेटनेही पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. रॉकेटच्या पृथ्वीच्या कक्षेतील प्रवेशाबाबत चीनने खुलासा प्रसिद्ध केलेला नाही.

मात्र सध्या चीनचे ‘लॉंग मार्च ५बी’ हे प्रक्षेपक रॉकेट ताशी २७ हजार ६०० किलोमीटर्सच्या वेगाने पृथ्वीच्या कक्षेत घिरट्या घालत आहे. सुमारे ३०० किलोमीटर्स उंचीवरून भ्रमण करणार्‍या या रॉकेटकडून ९० मिनटात पृथ्वीची एक फेरी पूर्ण केली जात असल्याची माहिती ‘स्पेस न्यूज’ या वेबसाईटकडून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात हे चिनी रॉकेट पृथ्वीवरील कोणत्याही भागात कोसळू शकते, असा इशाराही या वेबसाईटने दिला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असणार्‍या ‘पेंटॅगॉन’कडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. ‘पेंटॅगॉन’चे प्रवक्ते माईक हॉवर्ड यांनी, ‘युएस स्पेस कमांड’ चीनच्या रॉकेटच्या फेर्‍यांवर नजर ठेऊन असल्याची माहिती दिली आहे. चिनी रॉकेट ८ मे रोजी पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र त्याची नक्की जागा केवळ काही तास अगोदर कळू शकेल, असेही स्पष्ट केले. तब्बल २१ टनांचे ‘स्पेस रॉकेट’ पृथ्वीवर कोसळणे ही अंतराळक्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी ‘अनकंट्रोल्ड रिएन्ट्री’ची घटना ठरेल, असा दावाही करण्यात येत आहे.

अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत अंतराळस्थानक व त्यानंतर रॉकेट पृथ्वीवर कोसळू देण्याची घटना चीनच्या अंतराळक्षेत्रातील इराद्यांवर शंका उपस्थित करणारी ठरत आहे. चीनकडून अंतराळात सोडण्यात आलेली रॉकेट्स, यान तसेच उपग्रह संशोधनाबरोबरच टेहळणी व लष्करी कारणांसाठी वापरण्यात येत असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. अमेरिकेच्या स्पेस फोर्सचे प्रमुख जॉन विल्यम रेमंड यांनी नुकताच चीनच्या ‘शिजियान १७’ या उपग्रहाच्या क्षमतेबाबत इशारा दिला होता. अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेनेही चीनच्या अंतराळातील हालचालींबाबत बजावणारा अहवाल गेल्या महिन्यात प्रसिद्ध केला होता.

अमेरिकेतील विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी, चीनच्या अंतराळातील महत्त्वाकांक्षांकडे लक्ष वेधताना त्यामुळे अंतराळात ९/११ घडू शकते, असा इशारा गेल्या वर्षीच्या अखेरीस दिला होता.

leave a reply