चीन व युएईमधील इंधनव्यवहारात युआनचा वापर

शांघाय/दुबई – गेल्या वर्षी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सौदी अरेबियाला भेट दिली होती. या भेटीत आखातातील अरब राष्ट्रांची संघटना असलेल्या ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’बरोबर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. बैठकीदरम्यान, चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी इंधनव्यापारात युआनचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले होते. जिनपिंग यांच्या आवाहनावर आखातातील प्रमुख देश असलेल्या सौदीसह इतर देशांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदविली होती. याचे परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली असून चीन व संयुक्त अरब अमिरातमध्ये(युएई) युआनचा वापर करून इंधनव्यवहार पार पडल्याचे समोर आले आहे.

चीन व युएईमधील इंधनव्यवहारात युआनचा वापर सुरुचीनमधील ‘शांघाय पेट्रोलियम ॲण्ड नॅचरल गॅस एक्सचेंज’ने व्यवहाराची माहिती दिली. युएईकडून 65 हजार टन ‘लिक्विफाईड नॅचरल गॅस’(एलएनजी) खरेदी करण्यात आला. ‘चायना नॅशनल ऑफशोअर ऑईल कॉर्पोरेशन’कडून करण्यात आलेला हा संपूर्ण व्यवहार युआन चलनात पार पडल्याचे शांघाय एक्सचेंजने सांगितले. सदर व्यवहारात फ्रान्समधील आघाडीची इंधनकंपनी ‘टोटल एनर्जीज्‌‍’देखील सहभागी असल्याचे चीनकडून सांगण्यात आले. फ्रेंच कंपनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चीन व युएईमधील इंधनव्यवहारात युआनचा वापर सुरुआघाडीचा इंधन निर्यातदार असलेल्या आखाती देशाने चीनच्या युआन चलनात केलेला व्यवहार ही चिनी चलनासाठी अत्यंत महत्त्वाची व निर्णायक घटना ठरली आहे. गेल्या काही वर्षात चीनने युआनला आंतरराष्ट्रीय स्तरावरील राखीव चलन म्हणून समोर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला यश मिळत असल्याचे संकेत युएई व चीनमधील इंधनव्यवहारातून मिळत आहेत.

चीनच्या युआन चलनाने सध्या आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील पाचव्या क्रमांकाचे राखीव चलन म्हणून स्थान मिळविले आहे. व्यापारी व्यवहारांमधील तिसऱ्या क्रमांकाचे चलन असणाऱ्या युआनने परकीय चलन व्यवहारांमध्ये सात टक्के वाटा मिळविल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली.

leave a reply