एलएसीवरील चीनचे अवैध बांधकाम खपवून घेणार नाही

एलएसीवरील चीनचे अवैध बांधकाम खपवून घेणार नाही

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील पँगाँग सरोवर क्षेत्रात चीन पूल उभारत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हे बांधकाम भारताच्या हद्दीत सुरू असल्याचे सांगून त्यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पण चीनचे हे बांधकाम सुरू असलेला भूभाग भारताचाच असला, तरी 1960 सालापासून तो चीनच्या ताब्यात आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. त्याचवेळी भारत आपल्या भूभागावरील अवैध बांधकाम खपवून घेणार नाही, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिला.

China's-illegal-constructionकाही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराच्या सहा डिव्हिजन्स एलएसीवर तैनात करण्यात आल्याचे उघड झाले होते. चीनच्या एलएसीवर इतक्या मोठ्या प्रमाणात तैनाती करून भारतीय लष्कराने चीनला सज्जड इशारा दिल्याचे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. एलएसीवरील चीनच्या लष्कराच्या हालचाली व या क्षेत्रात चीन करीत असलेले बांधकाम लक्षात घेऊन भारतीय लष्कराने ही तैनाती वाढविल्याचा दावा केला जातो. विशेषत पँगाँग सरोवर क्षेत्रात चीन उभारीत असलेला आणखी एक पूल भारतीय लष्कराचे लक्ष वेधून घेत आहे.

या बांधकामाकडे भारताची करडी नजर रोखलेली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली होती. शुक्रवारी बोलतानाही, अरिंदम बागची यांनी चीन उभारीत असलेल्या पूलाबाबत अधिक माहिती दिली. हा भूभाग भारताचाच असला तरी 1960 सालापासून इथल्या भूभागाचा चीनने अवैधरित्या कब्जा घेतलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातले बांधकाम भारताच्या सार्वभौमत्त्वाला अनादर करणारे ठरते, असे बागची पुढे म्हणाले. हे बांधकाम व या भूभागावरील चीनचा दावा भारताला अजिबात मान्य नाही व भारत ते खपवून घेणार नाही, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिला.

दरम्यान, चीन सहा दशकांपूर्वी बळकावलेल्या भारताच्या एलएसीवरील भूमीत बांधकाम सुरू करून त्याचा प्रचारयुद्धासाठी वापर करीत असल्याचे दिसत आहे. याआधीही चीनने असे प्रयत्न करून पाहिले होते. आत्ताच्या काळात भारताच्या ताब्यात असलेल्या हद्दीत शिरून आपले लष्कर बांधकाम करीत असल्याचा आभास चीनकडून निर्माण केला जात आहे. याद्वारे भारतीयांच्या मानसिकतेवर परिणाम घडवून आणण्याचा चीनचा डाव आहे. पण भारतीय लष्कराला मागे हटवून भूभाग ताब्यात घेणे व त्यावर बांधकाम सुरू करण्याची धमक चीनच्या लष्कराकडे नाही. त्यामुळे प्रचारयुद्धाचा आधार घेऊन चीन चीन भारतावर कुरघोडी करू पाहत आहे. भारतीय लष्कराने वेळोवेळी चीनचा हा डाव उधळला होता. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने चीन उभारत असलेल्या पुलाची माहिती देऊन चीनच्या डावपेचांची जाणीव करून दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून भारताने चीनच्या विरोधात आक्रमक निर्णयांचा सपाटा लावला आहे. शाओमी या मोबाईलनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेची चीनची कंपनी बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतल्याचे उघडझाले हेोते. या कंपनीवर भारतीय यंत्रणांनी धाडी टाकून साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी जप्त केल्या होत्या. या कारवाईवर चीनने नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून त्यांचे शिक्षण रोखणाऱ्या चीनला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. चिनी नागरिकांना व्हिसा नाकारण्याचा भारताचा निर्णय चीनला चांगलाच झोंबला होता.

अशारितीने भारत चीनच्या प्रत्येक डावपेचांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असताना, एलएसीवरील कारवायांद्वारे भारतवर दडपण टाकण्याचे नवनवे प्रयत्न चीनकडून केले जात आहेत. भारतीय लष्कर त्याकडे अतिशय सावधपणे पाहत असून लष्कराच्या सहा डिव्हिजिन्स एलएसीवर तैनात करण्याचा निर्णय या सावध धोरणाचाच भाग ठरतो. अशा परिस्थितीत आपण भारताच्या विरोधात बरेच काही करीत असल्याचे चित्र उभे करणे ही चीनची गरज बनली आहे. त्यासाठी चीन सध्या आपल्या ताब्यात असलेल्या भूभागात बांधकाम करीत आहे. याद्वारे भारतावर दडपण टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न चीनकडून केला जात आहे खरा. पण लष्कर तसेच परराष्ट्र मंत्रालय वेळोवेळी चीनच्या प्रचारयुद्धाची हवा काढून घेत असल्याचे दिसते.

leave a reply