चीनच्या लष्करावर कम्युनिस्ट पार्टीशी निष्ठावंत असलेल्यांचे नियंत्रण हवे

-राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

Communist-Partyबीजिंग – वाढती अस्थिरता व अनिश्चितता यामुळे चीनची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली असून अशा परिस्थितीत चीनच्या संरक्षणदलांवर सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीशी निष्ठावंत असलेल्या विश्वासार्ह लोकांचे नियंत्रण हवे, असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला. काही वर्षांपूर्वी जिनपिंग यांनी चीनच्या संरक्षणदलांवर नियंत्रण असणाऱ्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे प्रमुख पद स्वतःकडे घेऊन त्यावरील पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या संरक्षणदलात 20 लाख जवानांचा समावेश असून हे जगातील सर्वात मोठे संरक्षणदल म्हणून ओळखण्यात येते.

गेल्या दशकात कम्युनिस्ट पार्टी व चीनच्या सत्तेची सूत्रे हातात घेणाऱ्या शी जिनपिंग यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने पक्ष, लष्कर व देशावर आपली पकड अधिकाधिक घट्ट करणारे निर्णय घेतले आहेत. 2018 साली जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी असलेली वयाची व कालावधीची मुदत रद्द केली होती. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या विचारसरणीमध्ये ‘शी जिनपिंग थॉट’ म्हणून आपल्या धोरणांचा व विचारांचा समावेश करणे भाग पाडले होते. माओ व शाओपिंग यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत आपले नाव सामील करून जिनपिंग यांनी पक्ष व देशातील आपले स्थान मजबूत केले होते.

Xi-Jinpingमात्र ही पकड घट्ट करीत असतानाच जिनपिंग यांना सत्ताधारी पक्ष तसेच लष्करातील एका गटाकडून आव्हान मिळत असल्याचे दावे सातत्याने समोर येत आहेत. कोरोनाच्या हाताळणीत आलेले अपयश, आर्थिक पातळीवर बसणारे धक्के व आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनविरोधात उभी राहणारी आघाडी हे जिनपिंग यांच्या चुकीच्या निर्णयांचे फलित असल्याचे आरोप पक्षातील जुने सदस्य तसेच माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. जिनपिंग यांचे नेतृत्त्व बदलावे यासाठी हालचाली सुरू असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी लष्करावरील नियंत्रणासंदर्भात केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. जिनपिंग यांच्या या वक्तव्यामागे लष्कराने जिनपिंग यांच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास व एकनिष्ठता दाखवावी हा खरा हेतू असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनमधील अंतर्गत पातळीवर तीव्र होणाऱ्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी जिनपिंग युद्ध छेडण्याचा मार्ग पत्करु शकतात, असे दावे पाश्चिमात्य विश्लेषकांनी यापूर्वीच केले होते. युद्ध छेडून अपेक्षित निकाल हवा असेल तर लष्करावर पूर्ण नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यामुळेच जिनपिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत लष्करावर आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्यांची वर्णी लावण्याची योजना आखली आहे. त्याला योग्य पार्श्वभूमी तयार व्हावी, यासाठी ते पक्षाशी निष्ठा असण्याचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचे मानले जाते.

leave a reply