जपानच्या ओकिनावा बेटाजवळून चीनच्या विमानवाहू युद्धनौकेची गस्त

जपानने लढाऊ विमाने रवाना केली

F-15-Chinese aircraft

टोकियो – जपानने नवे संरक्षण धोरण जाहीर करून योनागूनी बेटावर हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याच्या निर्णयामुळे चीनची बेचैनी वाढली आहे. चीनच्या ‘लिओनिंग’ या विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या ओकिना बेटाजवळून प्रवास केला. त्याचबरोबर चीनच्या ड्रोनने या क्षेत्रातील जपानच्या बेटाजवळून गस्त घातल्याची बातमी चिनी माध्यमांनी दिली. यानंतर जपानने चीनच्या विमानवाहू युद्धनौका व ड्रोन्सविरोधात आपली लढाऊ विमाने रवाना केली.

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी आपल्या देशाच्या संरक्षण धोरणात आक्रमक बदल केले आहेत. यानुसार जपान मध्यम तसेच लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर जपान आपल्या मित्र व सहकारी देशांशी लष्करी तंत्रज्ञानाचे आदानप्रदान सुरू करणार आहे. तर आपल्या नव्या लष्करी धोरणात जपानने तैवानची सुरक्षा अधोरेखित केली आहे. गेल्याच आठवड्यात जपानने तैवानपासून 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या योनागूनी बेटावर हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचे जाहीर केले.

Chinese aircraftजपानचे नवे संरक्षण धोरण आणि लष्करी हालचाली या क्षेत्रातील तणावात भर टाकत असल्याचा आरोप चीन करीत आहे. जपानवर ठपका ठेवण्यापर्यंत चीन मर्यादित राहिला नसून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनने जपानचे प्रशासन असलेल्या बेटांच्या हद्दीत विमानवाहू युद्धनौका आणि ड्रोन्स रवाना केले. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओकिनावा आणि मियाकोजिमा बेटांच्या हद्दीतून चीनच्या लिओनिंग विमानवाहू युद्धनौकेने प्रवास केला. तर चीनच्या ‘डब्ल्यूझेड-7 सोअरिंग ड्रॅगन’ या टेहळणी ड्रोनने मियाकोजिमा बेटाजवळून गस्त घातली.

चीनची युद्धनौका आणि ड्रोनने जपानच्या सागरी अथवा हवाईहद्दीत घुसखोरी केली नसल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. चीनने अशी कुरापत करण्याआधीच जपानने आपली एफ-15 लढाऊ विमाने चिनी ड्रोन्सच्या विरोधात रवाना केली. जपानच्या ड्रोन्सने चीनच्या ड्रोन्सना पिटाळून लावल्याची माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. नव्या वर्षातील चीनच्या ड्रोन्सची ही पहिली प्रक्षोभक कारवाई असल्याचा आरोप जपानने केला.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून चीनच्या युद्धनौका आणि विनाशिका जपानच्या बेटांजवळ तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात गस्त घालत आहेत. गेल्याच आठवड्यात चीनच्या युद्धनौकांनी या सागरी क्षेत्रातील अमेरिकेच्या गुआम बेटाजळूनही प्रवास केला होता.

हिंदी

 

leave a reply