चीनची सशस्त्र पाणबुडी म्यानमारमध्ये दाखल

- भारताची चिंता वाढली

बीजिंग/यांगून – चीनची ‘टाईप ०३५ मिंग क्लास’ पाणबुडी म्यानमारमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे. या पाणबुुडीमध्ये म्यानमारमधील भारतविरोधी गटांसाठी शस्त्रसाठा असावा, असे दावे करण्यात येत आहेत. भारतापाठोपाठ चीनदेखील म्यानमारला पाणबुड्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही काही माध्यमांचे म्हणणे आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या म्यानमार दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर चिनी पाणबुडी दाखल झाल्याने भारताच्या चिंता वाढल्याचे सांगण्यात येते.

चीनची सशस्त्र पाणबुडी म्यानमारमध्ये दाखल - भारताची चिंता वाढलीसोशल मीडियावर संरक्षणक्षेत्राशी संबंधित काही विश्‍लेषक तसेच युजर्सने म्यानमारमध्ये दाखल झालेल्या चिनी पाणबुडीचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. ‘सायबरओसिंट’ नावाच्या ट्विटर युजरने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी म्यानमारच्या नौदलात नव्या चिनी पाणबुडीचा समावेश करण्यात आल्याचे दाखविले आहे. नौदल क्षेत्रातील विश्‍लेषक एचआय सटन यांनीही आपल्या सोशल मीडियावर म्यानमारमध्ये दाखल झालेल्या चिनी पाणबुडीचा उल्लेख केला आहे.

चीनची ‘टाईप ०३५ मिंग क्लास’ पाणबुडी डिझेल इलेक्ट्रिक प्रकारातील असून रशियन पाणबुडीच्या आधारे विकसित करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये दाखल झालेली पाणबुडी ‘मलाक्का स्ट्रेट’मधून अंदमान सीमार्गे म्यानमारमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येते. या पाणबुडीसाठी म्यानमारच्या नौदलाने आपली एक युद्धनौकाही पाठविली होती, असा दावा सूत्रांनी केला आहे. या पाणबुडीत शस्त्रसाठा असल्याचेही मानले जात असले तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही.

म्यानमारमध्ये यापूर्वी लष्करी राजवट असताना चीनने या देशाबरोबरील संबंध वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. म्यानमारच्या लष्कराला सर्वाधिक संरक्षणसामुग्री पुरविणारा तसेच प्रशिक्षण देणारा देश म्हणून चीन ओळखण्यात येतो. चीनने म्यानमारला एक ‘डीप पोर्ट’ विकसित करून दिले असून नौदल तळ उभारण्याच्याही हालचाली सुरू आहेत. ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातूनही चीनने म्यानमारमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यावर्षी म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर चीनने लष्कराला समर्थन दिले होते.

भारतानेही आपल्या ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’अंतर्गत म्यानमारशी संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी भारताने म्यानमारला एक ‘किलो क्लास’ पाणबुडी भेट दिली होती. भारत व म्यानमारच्या लष्करामध्ये विकसित झालेल्या या सहकार्यामुळे चीन अस्वस्थ झाला होता. या पार्श्‍वभूमीवर चीनने म्यानमारला पाणबुडी देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. पाणबुडीच्या माध्यमातून चीन म्यानमारमधील आपला प्रभाव अधिक वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी चीनने भारताविरोधात कारवाया करणार्‍या म्यानमारस्थित दहशतवादी गटांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य पुरविल्याचे उघड झाले होते. त्यामुळे चिनी पाणबुडी म्यानमारच्या नौदलात दाखल होणे भारताच्या चिंता वाढविणारे ठरते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply