तैवानी परराष्ट्रमंत्र्यांच्या मुलाखतीवरुन चीनच्या अधिकाऱ्याचा इस्रायलला इशारा

जेरूसलेम – ‘इस्रायलने चीनवरील अवलंबित्व कमी करावे’, ‘चीनला कुठल्याही प्रकारच्या सवलती देऊ नये’ आणि ‘चीन तुमच्यावर नाराज असेल, याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहेत, असे समजा’, असे सल्ले तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी इस्रायली दैनिकाच्या मुलाखतीत दिले होते. यामुळे चीन संतापल्याचे दिसत आहे. कारण चीनने इस्रायली दैनिकाला सदर मुलाखत डिलिट करण्याची सूचना केली. तसे केले नाही तर इस्रायलबरोबरील राजनैतिक संबंध ‘डाऊनग्रेड’ अर्थात कमी करण्याचा इशारा चीनने दिला आहे.

स्वतंत्र तैवान किंवा तैवानमधील लोकशाहीला समर्थन देणारे देश तसेच संघटनांविरोधात चीनने कठोर भूमिका स्वीकारली आहे. तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनने तैवानशी राजनैतिक सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या देशांवर बहिष्कार टाकला आहे. अशा परिस्थितीत, इस्रायलमधील आघाडीचे दैनिक ‘जेरूसलेम पोस्ट’ने गेल्या आठवड्यात तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांची मुलाखत प्रसिद्ध केली. यामध्ये तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणांवर केलेल्या टीकेला इस्रायली दैनिकाने विशेष महत्त्व दिले होते. या मुलाखतीत परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी इस्रायल चीनवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असल्याचे बजावले. ‘चीन हा हुकूमशाही देश असून त्यांचे व्यापाराबाबत स्वतःचे असे तत्वज्ञान आहे. चीन व्यापाराचा शस्त्रासारखा वापर करतो. हल्लीच्या काळात चीनने कितीतरी देशांबरोबर अशारितीने व्यापार केल्याचे आपण पाहिले आहे. लिथुआनिया, झेक प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलिया हे देश याचे उदाहरण ठरतात. अशा हुकूमशाही देशावर अवलंबून राहणे इस्रायलसाठी योग्य ठरणार नाही. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देणारा इस्रायल याची नक्कीच दखल घेईल, असा विश्वास मला वाटतो’, असे तैवानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले होते.

‘चीनबरोबर कधीही सशर्त सहकार्य करू नये. कारण जेव्हा तुम्ही चीनच्या अटी मान्य करता तेव्हा तुमच्या पराभवाची सुरुवात होते. तसेच ज्यावेळी चीन आपल्यावर नाराज होईल, या भीतीने आपण चीनला सवलती देतो, तो देखील चीनचा विजयच असतो. त्यामुळे चीन आपल्यावर नाराज होईल, असे वाटले तर त्याने गोंधळण्याचे कारण नाही. कारण याचा अर्थ आपण योग्य मार्गावर आहोत असा होतो’, असा सल्ला तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. त्याचबरोबर चीन तैवानवर हल्ल्याची तयारी करीत असल्याचा इशारा जोसेफ वू यांनी दिला. पण आपला देश देखील चीनला उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे तैवानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. या मुलाखतीमुळे चीन अस्वस्थ झाल्याच्या बातम्या येत आहेत. या बेचैनीमुळेच इस्रायलमधील चीनच्या दूतावासातील राजनैतिक अधिकाऱ्याने इस्रायली दैनिकाचे मुख्य संपादक याकोव्ह कात्झ यांना फोन करून धमकावले. ‘तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांची मुलाखत पूर्णपणे डिलिट करून टाका, अशी मागणी चिनी राजनैतिक अधिकाऱ्याने केली. अन्यथा चीन इस्रायलबरोबरील संबंधात कपात करील, असा इशारा या राजनैतिक अधिकाऱ्याने दिला आहे’, अशी माहिती कात्झ यांनी दिली. पण चीनच्या या धमकीनंतरही आपण तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांची मुलाखत डिलिट करणार नसल्याचे कात्झ यांनी स्पष्ट केले.

तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एका दैनिकाने घेतलेली मुलाखत देखील चीनलाअस्वस्थ करणारी ठरते आहे. चीन तैवानबाबत किती संवेदनशील आहे, हे यातून उघडझाल्याचे दिसत आहे.

leave a reply